स्थैर्य, सातारा, दि. 3 : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. कुठलाही रुग्ण बेडपासून वंचित राहू नये म्हणून कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी एक अॅप तयार करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी केल्या.
कोरोना संसर्गाबाबत करत असलेल्या उपाययोजना आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी ते बोलत होते.
बैठकीला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आ. जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी संग्रहालयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हे रुग्णालय लवकरात लवकर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरात येईल यासाठी कामांचे नियोजन करावे. प्रत्येक तालुकानिहाय कोरोना रुग्णांची संख्या संबंधित तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींना द्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत केल्या.
तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित तालुक्यांच्या प्रांताधिकारी यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींना कोरोना रुग्णांची संख्या रोजच्या रोज द्यावी. ज्यांना कोरोनाचा संसर्ग नाही व ते इतर आजारांसाठी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत अशा रुग्णांवर काही रुग्णालयांकडून उपचार केले जात नाहीत. त्यांना उपचार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. छत्रपती शिवाजी संग्रहालयात उभारण्यात येणारे कोविड रुग्णालय तीन आठवड्याच्या आत सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे. लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांनी एकत्र येऊन कोरोनावर मात करावी, असे आवाहन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी निवृत्त झालेल्या डॉक्टरांची मदत घ्यावी. ज्या कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, अशा रुग्णांची घरात व्यवस्था होईल का याची पाहणी करून त्यांना घरातच उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करावे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती प्रत्येक तालुक्याच्या आमदारांना द्यावी, अशा सूचना खा. श्रीनिवास पाटील यांनी केल्या.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना बेडची माहिती ऑनलाइन पद्धतीने व्हावी यासाठी एक कक्ष स्थापन करावा, अशा सूचना आ. जयकुमार गोरे यांनी केल्या. फलटण तालुक्यासाठी आमदार फंडातून व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावा, असे आ. दीपक चव्हाण यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी संग्रहालयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात कोणकोणत्या सुविधा असणार आहेत याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
बैठकीनंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आ. जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी संग्रहालयात उभारण्यात येणार्या कोविड रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली.