
पाटण- पूरग्रस्तांना शासकीय मदत त्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे पत्र देताना शंभूराज देसाई.
स्थैर्य, सातारा, दि. 1 ऑक्टोबर : पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी विविध विभागांची पथके तयार करावीत. अतिवृष्टीमुळे बाधित प्रत्येक शेतकर्याचा समावेश पंचनाम्यात व्हावा आणि ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पाटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल त्वरित शासनाकडे सादर करावा, असे निर्देश दिले. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. डोंगरी भागातील काही गावांमध्ये खंडित झालेला वीज पुरवठा त्वरित पूर्ववत करावा. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी प्रत्येक गावाची पाहणी करून वीजपुरवठ्याच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, असेही सांगितले. तसेच, रस्ते, शाळा, अंगणवाड्या आणि पाणीपुरवठा योजनांचे झालेले नुकसान यांचेही पंचनामे तात्काळ करावेत, असे निर्देश यावेळी दिले.
रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून रस्त्यांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी, असे सांगितले. पाटण तालुका हा डोंगरी भागात येत असून, येथील पाणीपुरवठा योजना झर्यांवर अवलंबून आहेत. अतिवृष्टीमुळे या योजनांचे नुकसान झाले आहे, त्यांचेही पंचनामे करावेत. तसेच, डोंगरी भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी रुग्णवाहिका 24 तास कार्यरत ठेवाव्यात आणि नादुरुस्त रुग्णवाहिकांची त्वरित दुरुस्ती करावी, असे निर्देशही दिले.
वेताळवाडी येथील भात पिकाची पाहणी
पाटण तालुक्यातील वेताळवाडी येथे अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणेला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच बाधित शेतकर्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास शेतकर्यांना दिला. यावेळी ऑगस्टमध्ये मोठ्या पावसाने नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची शासकीय मदत त्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे पत्र व दैनंदिन संसार उपयोगी साहित्याचे किटचे वाटप केले.

