स्थैर्य, फलटण : येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या दुकान गाळ्यांसमोरील जागेमध्ये रस्त्याच्या कडेला एक अनाथ, बेघर वयोवृद्ध व्यक्ती आजारपणामुळे दोन दिवस पडून होता. गेले कित्येक दिवस स्थानिक व्यापाऱ्यांनी सदर व्यक्तीला मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडवले मात्र व्यक्ती आजारी पडल्याने व्यापारी हतबल झालेले होते. गत काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी सातारचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. मात्र पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडून आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. जपान टायर्सचे मालक संजय पवार यांनी नगरसेवक अनुप शहा यांना याबाबत कल्पना दिल्यानंतर तातडीने मदत करण्याबाबत विनंती केली. सदरची घटना समजतात नगरसेवक अनुप शहा यांनी पवार यांच्या दुकानाला भेट दिली. सदर बेघर व्यक्तीच्या कडे जाऊन आपुलकीने विचारपूस केली व त्याची परिस्थिती बघून तातडीने नगरपालिकेच्या प्रशासनाशी मुख्याधिकारी प्रसाद काटकर, आरोग्य अधिकारी विनोद जाधव यांना कल्पना देऊन ॲम्बुलन्स मागवून घेतली. एवढे करून न थांबता स्वतः शहा यांनी या बेघर अनाथ व्यक्तीला स्ट्रेचरवर झोपून स्वतः ॲम्बुलन्स मध्ये घालून रुग्णालयाकडे रवाना केले व लागेल ती मदत उपलब्ध करण्याच्या सूचना नगर परिषद प्रशासनाला दिल्या. नगरसेवक अनुप शहा यांनी माहिती मिळाल्यापासून पंधरा ते वीस मिनिटाच्या आत या बेघर अनाथ व्यक्तीला मदत उपलब्ध केल्याबद्दल व्यापारी संजय पवार, भरत मिंड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले. या वेळी बोलताना नगरसेवक अनुप शहा म्हणाले कि, जे का रंजले गांजले, अनाथ बेघर आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांच्या सेवेत ईश्वर सेवा होत असते. या गोष्टीवर माझा विश्वास असून परमेश्वराने माझ्या हातून हे काम करून घेतले याबद्दल मी परमेश्वराचा ऋणी आहे.