शेती व पिण्याच्या पाण्यासाठी नीरा उजवा कालव्याद्वारे त्वरित पाणी सोडावे; शेतकऱ्यांसह नागरिकांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । फलटण । फलटण शहर व तालुक्यातील सुमारे ३५/४० गावांच्या पिण्याचे पाणी योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असून कालवा बंद झाल्यानंतर १५ दिवसापेक्षा अधिककाळ या सर्व पाणी पुरवठा योजना कार्यान्वित राहु शकत नाहीत, दि. २१ जून रोजी कालवा बंद झाला असून दि. ५/६ जुलैला पुन्हा सुरु होणे अपेक्षीत असताना कालवा सुरु न झाल्याने तालुक्याच्या बागायती पट्ट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

फलटण शहर पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावातील पाणी साठा मर्यादित असून कालव्यात पाणी सोडले गेले नाही तर पुढील आठवड्यात शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान तरडगाव, साखरवाडी, विडणी, कोळकी वगैरे मोठ्या गावासह अन्य छोट्या गावांच्या पिण्याच्या पाणी योजना आगामी २/३ दिवसात अडचणीत येण्याची शक्यता आहे. कोळकी गावात आताच ४ दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. नीरा उजवा कालवा विभागाकडे चौकशी केली असता दि. १५ जुलै दरम्यान कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दि. १५ जुलै म्हणजे आणखी ८/९ दिवस कालव्यात पाणी सोडले जाणार नसल्याने तालुक्यातील ३५/४० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान यावर्षीच्या हंगामात तुटणारा ऊस, आता तुटलेल्या ऊसाचा खोडवा, जून मध्ये झालेल्या ऊसाच्या लागणीसाठी आणि आता दि. १५ जुलै पासून सुरु होणाऱ्या ऊस लागणीसाठी तसेच चारा व खरिपातील अन्य पिकांसाठी कालव्याच्या पाण्याची तातडीने आवश्यकता असताना कालवा दि. १५ जुलै पर्यंत बंद राहणार असल्याने बागायती पट्ट्यातील शेतकरी धास्तावला आहे.

वीर धरणात सुमारे ४५/५० % पाणी उपलब्ध आहे, फलटण तालुक्याच्या वाट्याचे उन्हाळी हंगामाचे पाणी शिल्लक असल्याने नीरा उजवा कालवा विभागाने तातडीने नियोजन करुन आगामी १/२ दिवसात नीरा उजवा कालव्याचे पाणी सोडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी व ग्रामपंचायत क्षेत्रातून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!