तालुक्यातील हॉटस्पॉट असलेल्या गावामध्ये तातडीने प्रतिबंधक उपाययोजना राबवा; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १५ : सध्या फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी स्थानिक गावामध्ये कोरोना प्रतिबंधक उपायोजना करणे हे अत्यंत गरजेचे आहे. तरी फलटण तालुक्यामधील कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना तातडीने कराव्यात असे आदेश विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या आहेत.

फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी ऑनलाईन मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सदरील मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती. ह्या मिटिंगसाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, फलटणचे उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांच्यासह फलटण पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोना बाधित रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीतील रुग्णालयांमध्ये दखल केले जाते. तथापि, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना जर त्यांच्या घरात योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परंतु होम आयसोलेशन मध्ये असलेल्या कोरोना बाधित रुग्णांकडून जर नियमांचे पालन केले जात नसेल तर त्यांना सक्तीने संस्थामक विलीगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात यावे, असेही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये होम आयसोलेशन मध्ये असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून नियमांचे काटेकोर पालन केले जात नाही. तरी अश्या रुग्णांना संस्थामक विलीगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात यावे. गृह विलीगीकरणामध्ये असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांचे वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. तपासणी करताना संबंधित गावातील पूर्वीचे आजार असणाऱ्या नागरिकांची सुद्धा प्राथमिक तपासणी हि ग्रामपंचायत, पंचायत समिती व पोलीस प्रशाशनच्या संयुक्त पथकाने करावी, असे निर्देश सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी दिले.

फलटण तालुक्यामध्ये सरासरी ३०० कोरोनाबाधित रुग्ण हे रोज सापडत आहेत. या साठी फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी शाशनाने पारित केलेल्या त्रिसुतीचे काटेकोर पालन करण्यात यावे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर राखणे ह्या सर्व गोष्टींचे पालन करणे हे आवश्यक आहे. फलटण तालुक्यामधून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गाव पातळीवरील ग्राम दक्षता समित्यांनी कायम सतर्क राहून काम करणे गरजेचे आहे. त्यांना लागणारी आवश्यक ती मदत पंचायत समिती व प्रशासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी या वेळी दिली.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर मंगल कार्यालये हि अधिगृहीत करण्यात येणार आहेत. या सोबतच कोरोनाबाधित रुग्णांचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व हॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये कोरोना तपासणीचे कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी दिली.

फलटण तालुक्यामध्ये कोरोना रुग्णाच्या तपासणी साठी तपासणी किट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाहीत. तरी तातडीने किट्स उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!