दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यामध्ये गत महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी कोळकी पंचायत समिती गणाचे सदस्य सचिन रणवरे यांनी केल्यावर फलटण तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसानाची पंचनामे तातडीने करावेत, असे आदेश पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
फलटण पंचायत समितीच्या सभागृहात मासिक सर्वसाधारण सभा सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेली होती. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार, उपसभापती संजय सोडमिसे, सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक गुळवे, सदस्य सचिन रणवरे, संजय कापसे, बाळासोा ठोंबरे, सौ. रेश्मा भोसले, सौ. प्रतिभा धुमाळ, सौ. विमल गायकवाड, सौ. रेखा खरात, सौ. सुशीला नाळे, सौ. कोळेकर, सौ. जयश्री आगवणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
फलटण तालुक्यातील तरडगाव गावामध्ये जवळपास तीन दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. तरी पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी पंचायत समिती सदस्या सौ. विमल गायकवाड यांनी केली. त्यावर तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावेत, असे आदेश सुध्दा यावेळी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
फलटण तालुक्यात आलेल्या ऊस तोड कामगारांच्या पाल्यांसाठी शासनाच्या वतीने वितरित करण्यात येणार्या आहाराची अंमलबजावणी योग्य रित्या करण्यात यावी. कोणताही लाभार्थी वंचित राहू नये, याबाबत विशेष काळजी घेण्याबाबतची मागणी सदस्य सौ. रेश्मा भोसले व सचिन रणवरे यांनी केल्यावर तालुक्यातील आलेल्या कोणताही लाभार्थी हा वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळेस दिले.
कोरोना विशेषतः ओमिक्रॅानबाबतचा सविस्तर आढावा सभागृहास देण्यात आला. तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी सुध्दा कोरोनाच्या त्रिसूत्री म्हणजेच मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर राखणे ही काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यातील विविध विभागांचा सविस्तर आढावा यावेळी पंचायत समिती सभागृहास घेण्यात आला.
फलटण तालुक्यातील विविध ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या बद्दल सत्कार यावेळी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर व उपसभापती संजय सोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील ३८ अंगणवाड्याना सतरंज्या प्रात्प झालेल्या होत्या. सदरच्या सतरंज्यांचे वाटप यावेळी करण्यात आले.