स्थैर्य, फलटण, दि. १५ : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन टप्प्यात लसीकरण झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु झालेले आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने फलटणचे तहसीलदार समीर यादव यांच्याकडे महत्वाची मागणी केलेली आहे. राज्यातील पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी विनंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, भटक्या आणि विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, युवा नेते राहुल शहा यांच्या उपस्थितीत तहसीलदार समीर यादव यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटकाळात पत्रकार हे अत्यंत संयमाने सातारा जिल्ह्याची काळजी घेत पत्रकारिता करीत आहेत. अनेक लोकोपयोगी सूचना ह्या पत्रकारांच्या वतीने मांडल्या जातात. पत्रकार हे सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही धोका आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी विनंती तहसीलदार समीर यादव यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने केलेली आहे.