स्थैर्य, फलटण, दि.२३: फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील लसीकरण केंद्रावर गावातील सत्ताधारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपल्या मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीने लसीकरणाचा लाभ मिळवून देत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला असून याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाडेगाव येथे पाच ते सहा वेळा लसीकरण झाले आहे परंतु शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणी लसीकरण होताना दिसत नाही. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला लसीपासून वंचित ठेवले जात आहे. सत्ताधारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपल्याच मर्जीतील लोकांना फ्रन्टलाइन वर्कर दाखवून लस देत आहेत. तसेच ज्यांना कोवीड होऊन गेला आहे अशाही लोकांना लस दिली जात आहे. दोन लसींमधील आंतर दुसर्याचा मोबाईल नंबर टाकून कमी केले जाते व परत त्याच व्यक्तीना लस दिली जाते. त्यामुळे सामान्य लोकांना लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण कार्यक्रमात नियमितता आणून लस उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागास सूचना कराव्यात अन्यथा आम्हाला आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव दडस, भटके विमुक्त जमाती सेलचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.