स्थैर्य, पाटण, दि. २१ : करोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी असून सर्व व्यवहार ठप्प असताना पाटण शहरात मात्र संचारबंदीतही दारू मुबलक प्रमाणात मिळत आहे. लॉकडाउन काळात पाटण शहरात बिनबोभाट अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जुन्या बसस्थानकावर दारू विक्री करणारी टोळी असून दारू विक्रीसाठी एकमेकांमध्ये स्पर्धाच निर्माण झाल्याचे दिसत आहे. यावर याला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने पुढाकार घेणे गरजेेचे आहे. पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागानेच याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
करोनावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. याचाच फायदा अवैध दारू विक्रेते घेत आहेत. सध्या पाटण शहराला अवैध व्यवसायाने ग्रासले असून अवैध धंद्यांना चांगलाच उत आल्याचे दिसून येत आहे. या अवैध धंद्यावर खाकीचा जरब बसणार तरी केव्हा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाकाळात समाजहित जपत शांतता सुव्यवस्था राहण्यासाठी अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर असली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. मध्यंतरी एक दोन कारवाईचा फार्स करण्यात आला. मात्र पुन्हा काही दिवसातच पाटण परिसरात दारू विक्री जोमाने होवू लागली.
दारू विक्रीत युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर ग्रासला आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात या मार्गाकडे वळला आहे. एवढंच नाही तर युवक हा मोबाईलवर संपर्क करून घरपोच सुविधा पोहचविल्या जात आहे तर अनेक ठिकाणी चालता बोलताही दारूची विक्री केली जात आहे. त्यामुळे शहरात बंद असलेली दारू जागोजागी मिळताना दिसत आहे. 150 ते 200 रुपयाला देशी दारूची बाटली विकल्याचे बोलले जात आहे. लॉकडाउन काळात दारू विक्रेत्यांचा चांगलाच जम बसला आहे. या अवैध दारू विक्री करणार्यांना पोलिसांचे अभय आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना कसल्याही प्रकारची भीती न राहिल्याने दारू विक्रीचा धंदा फोफावला असून दारू विक्रेत्यांची टोळीच पाटण शहरातील जुना बसस्थानक परिसरात निर्माण झाली आहे. पावला- पावलावर शहरात अनेक ठिकाणी खुलेआम सर्रासपणे अवैध दारू विक्री होताना लोकांना उघड्या डोळ्यांनी दिसते. मात्र ही माहिती पोलिसांना नाही का हाच प्रश्न नागरिकांना भेडसावत असून आता राज्य उत्पादन शुल्क विभागानेच याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातील सूज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.
पाटण शहरात 5 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर होताच अनेकांनी दारूचा स्टॉक करून ठेवला आहे. लॉकडाउनचा फायदा घेत ही मंडळी सर्रासपणे दररोज चोरटी दारू विक्री करत आहेत. कुठे शटरमध्ये, नाल्यात फरशीखाली तर कुठे घरात दारूचे बॉक्स ठेवून विक्री केली जात आहे. मुळातच ज्या दुकानदारांनी या युवकांना दारूचे बॉक्स दिले आहेत त्यांचा शोध घेवून दारू दुकानाचे लायसेन्स रद्द केले पाहिजे, अशा प्रतिक्रियाही नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.दरम्यान, पाटण शहरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दाद मागणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. ना. शंभूराज देसाई यांनीही याकडे गांभीर्याने पहावे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.