
स्थैर्य, 23 जानेवारी, फलटण : निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सातारा या कार्यालयाने दिनांक 22 जानेवारी रोजी मौजे सालपे ता. फलटण जि.सातारा येथे हॉटेल मधुसागर मध्ये बेकायदशीर गोवा बनावटीच्या विदेशी मद्यावर महाराष्ट्र राज्यातील बनावट लेबल चिटकावून विक्री करणार्या ठिकाणावरुन आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी आरोपींच्या ताब्यातून त्यांच्याकडील 5 लाख 61 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा कार्यालयाने केली. कारवाईमध्ये निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, विजय मरोड, पांडुरंग कुंभार, सागर आवळे, अजित रसाळ, राणी काळोखे, आबासाहेब जानकर, अरूण जाधव, बाळासो पांचुदे यांनी भाग घेतला. गुन्ह्याच्या पुढील तपास निरीक्षक माधव चव्हाण भरारी पथक, सातारा हे करीत आहेत.
जिल्ह्यामध्ये कोणत्याही बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक होत असल्यास त्याची माहिती तात्काळ राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास देण्यात यावी, असे आवाहन अधीक्षक श्री. भुतकर यांनी केले आहे.

