दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२१ । फलटण । दुधेबावी, ता. फलटण येथील ओढ्यातील वाळू चोरट्या पद्धतीने व बेकायदेशीर पणे उत्खनन करून वाहतूक करत असताना फलटण ग्रामीण पोलिसांनी एका टिप्परवर कारवाई केली असून या प्रकरणी पोलिसांनी आठ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या समंधी तीन जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे तर एकास अटक करण्यात आली आहे.
या संबंधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, मंगळवार दि. २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास दुधेबावी गावच्या हद्दीतील हॉटेल शौर्य समोरून एक आयशर टिप्पर येताना पोलिसांना दिसला. त्यास थांबवून त्याची पाहणी केली असता त्यामध्ये त्यांना दोन ब्रास वाळू वाहतूक करीत असताना दिसून आली. सदर वाळू दुधेबावी येथील ओढ्यातून अनधिकृतपणे अतिक्रमण करून व वाळू उत्खननाचा परवाना नसताना उत्खनन व वाहतूक केली म्हणून अमोल सोमनाथ राठोड, वय २४, सागर राजेंद्र जाधव, दोघेही रा. झिरपेगल्ली, फलटण, ओम सोडमिसे (पूर्ण नाव माहित नाही), रा. सोमंथळी या तिघांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या पैकी पोलिसांनी सोमनाथ राठोड यांस अटक केली असून अन्य दोघे फरारी आहेत. सदर कारवाईत पोलिसांनी आठ लाख ५० हजार रुपये किमतीचा आयशर टिप्पर व चौदा हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण आठ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस. बी. राऊत करीत आहेत.