मन,बुद्धी,प्रेमाने मेहनत केली तर किस्मत बदलते – उद्योजक,भावेश भाटिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । सातारा । ‘’फुटपाथवरून मी माझे आयुष्य सुरु केले. व्हिजन आयुष्यात खूप महत्वाचे आहे.ज्याला व्हिजन नाही त्याचे जीवन बेकार आहे. अडचणी संकटे यायला हवीत,त्याच संधी समजून,आव्हान समजून आयुष्यात नवे मार्ग मिळतात. घरातून बाहेर पडले पाहिजे.व्यवसाय करायचा असेल तर आपले डोके लावले पाहिजे. ग्राहकांना प्रेमाने जोडले तर
व्यवसाय होतो. व्यवसायात विश्वास खूप महत्वाचा आहे. मी माझ्या आयुष्यात माणसे प्रेमाने जोडली. मी प्रेमाने भेट म्हणून दिलेल्या वस्तूमुळे मला पुढे लाखो रुपयाचा व्यवसाय मिळाला.माझ्या प्रेम आणि मेहनतीमुळे मला पत्नी मिळाली. पत्नीने माझ्यावर विश्वास दाखवला.पत्नीचे मन इतके सुंदर होते की गुलाबाची फुले तिच्याफुढे फिकी होती. संधीची वाट बघत बसण्यापेक्षा आपल्या प्रयत्नाने अनेक संधी आपण उभा करू शकतो. २० किलो भांडवलातून व्यवसाय सुरु केला.आज अनेक देशात आमच्या सनराईज बत्ती जगाला प्रकाश देत आहेत. अंबानी कुटुंबीयांनी मला खूप साथ दिली.नीता अंबानीनी माझ्या आत्मकथनास प्रस्तावना लिहिली आहे. किंग फिशर कंपनीकडून साडेतीन लाख वस्तूची मागणी मिळाली. त्यातून पैसे मिळाले.मला विद्यार्थ्यांना सांगावे वाटते की प्रत्येकाने मार्केटिंग शिकले
पाहिजे. संघर्ष करून मिळवीत राहिले पाहिजे.कोणत्याही गोष्टीत हार्डवर्क मेहनत महत्वाची असते.त्याला दुसरा पर्याय नाही. द  न, बुद्धी, प्रेमाने मेहनत केली तर किस्मत बदलत असते’’ असे विचार पप्रेरणादायी प्रसिध्द वक्ते उद्योजक भावेश भाटीया यांनी व्यक्त केले. ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे होते. तर प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर,व प्राचार्य आर.डी.गायकवाड यांची उपस्थिती होती.

यश मिळायचे असेल तर काय हवे हे सांगताना ते पुढे म्हणाले ‘’ व्यवसायात शॉर्टकट नसावा. अनेक लोक आज आरक्षण,गरिबी या गोष्टी सांगत राहतात.त्यावर विसंबून राहतात. आयुष्यात अपयश येत असते पण त्यालाच संधी समजून त्यावर आपले बंगले बांधायचे असतात.माणसाने उतावीळ होऊ नये. माणसाने निराश होऊ नये. निराशेला पुसून टाकून पुढे जायचे असते. आपण वाईट विचार करू नये. आपल्या आत एक उर्जा असते. आपण दुसऱ्याचे दोष काढत आयुष्य घालवू नये. बोटात घातलेल्या ग्रहाच्या अंगठ्या आपले नशीब बदलत नसतात. आकाशातले तारे आपले भविष्य घडवीत नसतात.आपणच आपल्याला घडवायचे असते. मी १५० पेक्षाही जास्त मेडल मिळविलेले आहेत. मी शाकाहारी आहे. रोज व्यायाम करतो,आणि रनिंग करतो. जीवनात पैशाची आवश्यकता आहे. पण त्याच्या
नादात बेईमान करून पैसा मिळवू नये. आपण व्यवसाय करून अनेकांचे जीवन उभे करायला हवे,कोणत्याही क्षेत्रात ध्येय असायला हवे असे मत त्यांनी पुन्हा व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ.मेनकुदळे म्हणाले ‘’ भावेश भाटीया यांचा सकारात्मक दृष्टीकोन आपण घ्यायला हवा. छत्रपती शिवाजी कॉलेजची भूमी ही पवित्र भूमी असून कर्मवीर भाऊराव पाटील यांची उर्जा इथे आहे. उच्च ध्येय आणि कष्ट करण्याची शक्ती असेल तर आपले उद्देश सफल होतातच असे ते म्हणाले ‘नाचे मयुरी’ या चित्रपटात एक पाय नसताना देखील एक युवती आपली नृत्य करण्याचे स्वप्न कठोर परिश्रमाने व जिद्दीने पूर्ण करते, तोच ध्यास आयुष्यात घ्यायला हवा असे ते म्हणाले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर यांच्या प्रतिमांना फुले अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी प्रमुख अतिथी यांचा परिचय करून देत प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी व अध्यक्ष व उपस्थित मान्यवर यांचे स्वागत केले. अहवाल वाचन शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विक्रमसिंह ननावरे यांनी केले. वर्षभरात वार्षिक परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी तसेच क्रीडा , सांस्कृतिक,वक्तृत्व वादविवाद इत्यादी विविध स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव उद्योजक भावेश भाटीया यांचे हस्ते करण्यातआला. महाविद्यालयातील शिक्षकांनी विविध क्षेत्रात गुणवत्ता संपादन केल्याबद्दल व पुरस्कार मिळविल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. गुणवत्ता यादीचे वाचन प्रा.डॉ.शिवाजी पाटील व प्रा.विक्रमसिंह ननावरे यांनी केले. आभार प्रा. अभिषेक कदम यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र तांबिले व डॉ.विद्या नावडकर यांनी केले.या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य ,प्राध्यापक ,विद्यार्थी,व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.


Back to top button
Don`t copy text!