वाचायचं असेल तर कोवीड केअर सेंटरमध्ये भरती व्हावंच लागेल; ना.श्रीमंत रामराजेंची सक्त ताकीद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.३१ : ‘‘कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या उलट परिस्थिती या दुसर्‍या लाटेत आहे. या लाटेत शहरांपेक्षा ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याचे आपण पाहिले आहे. ग्रामीण भागातील लोक गावातील दक्षता समिती, आशा वर्कर यांचे ऐकत नाहीत. दमदाट्या करुन विलगीकरण कक्षात जायला नकार देतात आणि गृहविलगीकरणात राहून एक रुग्ण दहा जणांना बाधित करत आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात शासनाच्या यंत्रणेची सर्व ताकद लावून सक्तीने कोरोना चाचणी आणि संस्थात्मक विलगीकरण करावं लागणार आहे. जर तुम्हाला वाचायचं असेल तर ऐकावं लागेल; जर वाचायचं असेल तर कोवीड केअर सेंटरमध्ये भरती व्हावंच लागेल’’, अशी सक्त ताकीद महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तालुकावासियांना उद्देशून दिली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या माध्यमातून ढवळपाटी, वाखरी ता. फलटण (जलनायक श्रीमंत रामराजे नगर) येथील उप बाजार आवारातील कृषी लक्ष्मी मंगल कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षाचे उदघाटन समारंभात मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते, अध्यक्षस्थानी आ. दिपकराव चव्हाण होते, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उपसभापती भगवानराव होळकर, बाजार समिती संचालक, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर, गोविंदचे संचालक श्रीमंत सत्त्यजितराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर आदी मान्यवर उपस्थित होते

ना.श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, ’‘निंबळक सारख्या चार – पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात साडेतिनशे कोरोनाबाधीत रुग्ण सापडत असतील तर हे भयानक आहे. त्यामुळे आता सक्तीने संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. बाधीत रुग्ण वेळीच विलगीकरण केंद्रात दाखल झाल्यावर गावांमधील वाढते संक्रमण रोखता येईल. तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात एक याप्रमाणे कोरोना उपचार व विलगीकरण कक्ष सुरु केले आहेत. विलगीकरण केंद्रात जर एखादा बरा झाला नाही तर त्याला तेथूनच रुग्णालयात दाखल केले जाईल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा व व उपाययोजनांसाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आत्तापर्यंत आपण इतकी वर्षे राजकारणात संघर्ष करत आलो आहोत. आत्ताही या विषाणूच्या विरोधात आपल्याला लढाई जिंकायची आहे. कोरोनाच्या लाटेत आपण अनेक जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. घरातील कर्ता माणूस गेला की त्या घराची काय अवस्था होते हे माझ्यापेक्षा जास्त जवळून तुम्ही पाहिले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बाकीचे सगळे राजकारण थांबवून आपापल्या गावातील परिस्थिती सुधारण्यासाठी काम करावे. अडचणीच्या काळात तुम्ही गावकर्‍यांसोबत राहिलात तर गावकरी तुमच्या सोबत राहतील. गावागावातली कार्यकर्त्यांची फळी दक्षता समित्यांच्यासोबत मदतीसाठी उभी रहात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. पुढच्या पिढीसाठी, तालुक्याच्या भविष्यासाठी आता कडक पाऊले उचलावी लागणारच आहेत.’’, असेही ना.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी सूचित केले.

‘‘एक महिन्यापूर्वी ऑक्सीजनच्या उपलब्धतेवरुन निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आपण बघितली आहे. आता त्यात म्युकरमायक्रोसिस हा नवा आजार आला आहे. त्याबाबतचे उपचार, औषधे उपलब्ध करायचे काम प्रशासन करेलच पण आपल्याला आणखीन दक्षता घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून फलटण, माण व खंडाळा या तालुक्यासाठी कुठल्याही परिस्थितीत आपण फलटणला जंबो कोवीड रुग्णालय उभारणार आहोत. आरोग्यविषयक सुविधांच्यादृष्टीने फलटण मध्यवर्ती केंद्र बनू शकेल. आरोग्य मंत्र्यांच्याकडून दीड महिन्यापूर्वीच झिरपवाडीचे बंद अवस्थेत असलेले ग्रामीण रुग्णालय खाजगी तत्त्वावर सुरु करण्यासाठी आवश्यक ती परवानगी आपण घेतलेली आहे. याठिकाणी लवकरच अद्ययावत हॉस्पिटल उभे राहील’’, असे आश्‍वासनही ना.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिले.

‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीने विविध सेवा, सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, आपण स्वतः संपूर्ण तालुक्याचा दौरा करुन लोकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्या त्यापलीकडे जाऊन या तालुक्यात शेतकरी व सर्वसामान्य माणूस वैद्यकीय सेवा सुविधांपासून वंचित राहु नये म्हणून महाराजा मालोजीराव मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी बाजार समितीच्या आवारात करण्यात येत असून लवकरच दर्जेदार वैद्यकीय सेवेचे दालन फलटण करांच्या सेवेत दाखल होत आहे,’’ असे बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

‘‘बाजार समितीचे दोन संचालक व तालुक्यातील अनेकांचे अकस्मात झालेले निधन आम्हाला कोरोनाची धास्ती वाढविणारे ठरल्याने बाजार समितीने हे विलगीकरण केंद्र सुरु केले असून येथे व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन व जनरल बेडची व्यवस्था तसेच डॉक्टर्स व अन्य वैद्यकीय कर्मचारी, औषधे उपलब्ध करुन देऊन एक उत्तम कक्ष उभारला आहे, परिसरातील ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा’’, असे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम पोटे, हिंदकेसरी पै. बापूराव लोखंडे, माजी सभापती मोहनराव लोखंडे व रामभाऊ ढेकळे, ढवळ सरपंच अंकुश लोखंडे, आप्पा लोखंडे, शंकर लोखंडे, तरडफ माजी सरपंच रवी पिसाळ, पिराचीवाडी सरपंच दीपक सावंत, रणजित तांबे, अधिकराव ढेकळे, अशोकराव निंबाळकर, नंदू भाऊ नाळे, आशा वर्कर्स, बिबी आरोग्य केंद स्टाफ, मार्केट कमिटी स्टाफ यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी उपसभापती भगवानराव होळकर यांनी सर्वांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर फित कापून विलगीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात आले, सचिव शंकरराव सोनवलकर यांनी समारोप व आभार मानले. प्रा. नवनाथ लोखंडे यांनी सूत्र संचालन केले.


Back to top button
Don`t copy text!