माझ्याविषयी खोटी माहिती पसरवली तर कायदेशीर कारवाईला तयार राहा- करण जोहर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि. २६ : गेल्या काही दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टीतील अंमली पदार्थांच्या कनेक्शनबाबत सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीमध्येही ड्रग्जचा वापर करण्यात येतो, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होता.

या प्रकरणी करण जोहरने अनेक दिवस प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता करणने याबाबत मौन सोडलं असून, आपल्या पार्टीमध्ये ड्रग्जचा अजिबात वापर होत नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

“माध्यमांमध्ये विकृत पद्धतीने, बिनबुडाचे आणि खोटे आरोप करण्यात येत आहेत. हा प्रकार बंद व्हावा. अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही,” असा इशाराही करणने दिला आहे.

करण जोहरने ट्विटरवर पत्रक जारी करत आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे.

तो म्हणाला, “मी 28 जुलै 2019 रोजी दिलेल्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर करण्यात आला, अशा आशयाच्या बातम्या काही वृत्तवाहिन्या, प्रिंट तसंच सोशल मीडियावरही प्रकाशित करण्यात येत आहेत. मी त्या पार्टीनंतरच याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. या बातम्या खोट्या असून वाईट हेतूने या बातम्या दिल्या जात आहेत. पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर झाला, हा आरोप बिनबुडाचा आहे. त्यावेळी कोणत्याच अंमली पदार्थांचा वापर करण्यात आला नव्हता.”

मी स्वतः ड्रग्ज घेत नाही. तसंच अशा प्रकारच्या कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याला मी प्रोत्साहन देत नाही, असं करणने म्हटलं.

या सगळ्या बातम्यांमुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनाही मानसिक त्रास होत आहे. या सर्व प्रकारामुळे तो द्वेष आणि चेष्टामस्करीचा विषय बनला आहे, असं करण म्हणाला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्जच्या सेवनाबाबत माहिती समोर आली आहे.

सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याप्रकरणी तुरुंगात आहेत. इतर काही लोकांविरुद्ध तपास सुरू आहे.

याप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोणला शनिवारी (26 सप्टेंबर) NCB कडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. तर 25 सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकूल प्रीत सिंह हिची चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, या पार्टी संदर्भात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून NCB करण जोहर याला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. अभिनेत्री रकुल प्रीत हिने चौकशीदरम्यान करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीचा उल्लेख केला होता. या पार्टीसंदर्भात धर्मा प्रोडक्शनचे दिग्दर्शक क्षितीज प्रसाद यांचीही चौकशी करण्यात आल्याचे समजते. करण जोहर याने स्वत: या पार्टीचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या पार्टीमध्ये विक्की कौशल, दीपिका पादुकोण, झोया अख्तर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, रणबीर कपूर उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!