श्रीमंत मालोजीराजांचा वारसा सांगत असाल तर झिरपवाडी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट घालू नका : खासदार रणजितदादा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि. २ : झिरपवाडी (ता. फलटण) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय नव्याने सुरु होणे आवश्यक असून यासाठी आपला सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. मात्र ना.श्रीमंत रामराजे यांचा या शासकीय रुग्णालयाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या खाजगीकरणाला आपला विरोध असून श्रीमंत मालोजीराजांचा वारसा सांगत असाल तर या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट घालू नका; अन्यथा जनतेला सोबत घेवून आंदोलनाद्वारे याचा विरोध केला जाईल, असा इशारा माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.

झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालय सुमारे 25 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या ठिकाणच्या इमारतीचे नुतनीकरण करुन हे हॉस्पिटल नव्याने सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे लक्ष वेधले होते. त्यावर ना.अजितदादा पवार यांनी यंत्रणेला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बंद अवस्थेतील ग्रामीण रुग्णालय इमारतीची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेचच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका कार्यक्रमात झिरपवाडीचे रुग्णालय आपण खाजगी तत्त्वावर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत लवकरच हे हॉस्पिटल सुरु होईल असे सांगीतले. त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या खाजगीकरणाला आपला विरोध दर्शवला आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात खासदार रणजितसिंह यांनी नमूद केले आहे की, तालुक्यामध्ये कै. माजी आमदार चिमणराव कदम यांच्या काळात फलटण शहराच्या लगत ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी झिरपवाडी परिसरातील लोकांना विनंती करून 8 एकर जागा उपलब्ध करून घेतली व त्यावर ग्रामीण रुग्णालय उभारले गेले परंतु त्यावेळच्या राजकीय विरोधामुळे ते ग्रामीण रुग्णालय उभे राहून सुद्धा सुरू होऊ शकले नाही. त्यानंतर आजवर तालुक्यात राजे गटाची सत्ता असताना हे रुग्णालय सुरु होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. गेल्या मार्च मध्ये कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर त्यानंतरच्या पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे रुग्णालय फलटण तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी सुरु होणे गरजेचे असल्याचे सूचित केले होते. त्यानंतर राज्यशासनात याबाबत पाठपुरावा केला. मात्र ही गोष्ट लक्षात येताच ना.श्रीमंत रामराजे यांनी हे रुग्णालय खाजगी तत्त्वावर सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

वास्तविक तालुक्यात चार साखर कारखाने, इतर छोटे मोठे उद्योग असल्याने या ठिकाणी मजूर लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय शेतकरी, छोटे व्यावसायिक, कामगार, हातावर पोट भरणार्‍या गोरगरीब जनतेची संख्या तालुक्यात लक्षणीय आहे. खाजगी रुग्णालयांमधील उपचाराचा खर्च लोकांना परवडत नाही. त्यामुळे हे रुग्णालय शासकीय तत्त्वावरच सुरु होणे गरजेचे आहे. ही परिस्थिती ज्ञात असून सुद्धा ना.श्रीमंत रामराजे या रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट घालत आहेत. मात्र हे आपण कदापीही होवून देणार नाही. यासाठी वेळप्रसंगी आंदोलनसुद्धा उभे केले जाईल. या रुग्णालयासाठी माझ्या खासदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले आहे. शासनाकडे निधीची कमतरता असल्यास आपण पक्षाच्या माध्यमातून राज्यसभा व विधान परिषद सदस्यांकडूनही निधी उभारण्यासाठी प्रयत्न करु. ना.श्रीमंत रामराजे यांनी या प्रकरणात कुठलेही राजकारण करु नये. वखार महामंडळाच्या जागेत प्रस्तावित जंबो कोवीड रुग्णालयासाठी त्यांनी प्रयत्न करावा. आपलेही खासदार म्हणून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!