दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
देशाची भावी युवा पिढी सामाजिक, शारीरिकदृष्ट्या सुदृढ करायची असेल तर व्यायाम हा प्राथमिक आणि मुलभूत आहे. शारिरीक तंदुरुस्ती निर्माण झाल्याने आपली सामाजिक, मानसिक शरीरयष्टी दणकट होण्यास मदत होते. आपला सर्वांगीण विकास होतो, यासाठी लहानपणापासून मुलांना व्यायामाचे धडे देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार स्व. धोंडीराम वाघमारे प्रतिष्ठान व फ्युचर फर्स्ट फाऊंडेशन नवी मुंबईचे अभय वाघमारे यांनी केले.
गोखळी, ता. फलटण येथे स्व. वाघमारे प्रतिष्ठानच्या विद्यमाने सामाजिक बांधिलकी जोपासून मोफत आरोग्य जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी वाघमारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम बझारचे संचालक मारुतराव गावडे होते.
पुढे बोलताना वाघमारे म्हणाले, लहानपणापासून मुलांना व्यायामाचे धडे दिल्यावर व्यायामामुळे आपल्या शरीरात हार्मोन्स तयार होतो, तो आपणास मानसिकदृष्ट्या कणखर आनंदी बनवतो. अभ्यासामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. माझे वडील माजी आमदार स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांनी आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या कालावधीत राजकीय, सामाजिक काम करत असताना आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उठवला. फलटण पूर्व भागातील जनतेशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जोपासले. या भागातील जनतेने माझ्या वडिलांवर जीवापाड प्रेम केले होते. त्यांच्या पश्चात आपणही या भागातील लोकांसाठी काहीतरी करायचे, या उद्दात उद्देशाने आमदार स्वर्गीय धोंडीराम वाघमारे प्रतिष्ठान व फ्युचर फर्स्ट फाऊंडेशन नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लोकांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्य व स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी गोखळी येथील जिल्हा परिषद शाळा व हनुमान विद्यालयातील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना फ्युचर फर्स्ट कन्सल्टंट संस्थापक अभय धोंडीराम वाघमारे यांनी स्वतः फिटनेसचे धडे दिले. रोजच्या जीवनात करायचे साधेसोपे व्यायामाचे प्रकार प्रात्यक्षिकासह करून दाखवले.
या कार्यक्रमास सरपंच सुमनताई गावडे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. शिवाजीराव गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खटके, गोखळी सोसायटीचे माजी चेअरमन तानाजी बापू गावडे, दादासाहेब खटके, हनुमान माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य हरीभाऊ अभंग, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे, महेश जगताप, बॉडी बिल्डर जगदीश मदने, प्रदिप आटोळे, अजित धुमाळ, पप्पू जगताप, मोहन ननवरे सर, सुनील सस्ते सर, विकास घोरपडे सर, किरण पवार सर, शुभांगी भोसले मॅडम, कुंभार मॅडम आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. शिवाजीराव गावडे यांनी केले, तर आभार मारुतराव गावडे यांनी मानले.