‘मोफत पास न मिळाल्यास शो बंद पाडू’; जयंत पाटलांनीच सांगितली पोलिसांच्या धमकीची कथा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२३ । मुंबई । अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावरुन कायम सक्रीय असतात. अमोल कोल्हे राजकारणात असले तरी अभिनयाची कास त्यांनी सोडली नाही. राजकारण ही माझी सेवा तर अभिनय हा माझा व्यवसाय असल्याचं ते सातत्याने सांगत असतात. सध्या त्यांच्या शिवपुत्र संभाजी या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर होत आहे. त्यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भात पोलिसांनीच धमकी दिल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट केलंय.

अमोल कोल्हेंच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग आज पिंपरीत होत आहे. त्यासाठी, तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच नाटकाची भुरळ  पडली आहे. त्यामुळे, तिकीट खरेदीसाठीही चाहत्यांची आणि शिवप्रेमी, शिवप्रेमी संघटनांची गर्दी होत आहे. मात्र, या महानाट्यसाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी मोफत तिकीटांची मागणी केलीय. तसेच, जर मोफत पास मिळाले नाहीत, तर शो बंद पाडू अशी धमकीही पोलिसांनी दिल्याचे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केलीय.

लोकसभेचे सदस्य व लोकप्रिय कलाकार असलेले डॉ. अमोल कोल्हे हे सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्याचे प्रयोग राज्यभर करत आहेत. राज्यभर त्यांच्या प्रयोगांना उदंड प्रतिसाद मिळत असून छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवन व कार्याविषयी जनजागृती होत आहे. मात्र, पिंपरी चिंचवड पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी या महानाट्याचे मोफत पास न मिळाल्यास नाटकाचे शो बंद पाडण्याची धमकी दिली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलीस दलाचे काम असून अशा काही निवडक लोकांमुळेच संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यात त्वरित लक्ष घालावे, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

राज्याच्या माजी मंत्र्यांदेखील पोलिसांच्या कृत्याबद्दल ट्विटरवरुन भूमिका किंवा तक्रार मांडावी लागत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.


Back to top button
Don`t copy text!