
स्थैर्य, विडणी, दि. १६ ऑगस्ट : शासकीय निधीव्यतिरिक्त पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून सुंदर शाळा उभी राहू शकते, याचे उत्तम उदाहरण विद्यानगर प्राथमिक शाळेने घालून दिले आहे. गावातील पालक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यास अशा अनेक आदर्श शाळा उभ्या राहतील, असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अव्वर सचिव धीरज अभंग यांनी केले. ते विद्यानगर, विडणी येथील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आणि शाळेतील विविध भौतिक सुविधांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विडणीच्या उपसरपंच मनीषा नाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेची नूतन इमारत आणि इंटरॲक्टिव्ह पॅनेल बोर्ड, सौर ऊर्जा युनिट, वॉटर प्युरिफायर अशा विविध सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गटविकास अधिकारी सुप्रिया शेंडे आणि सरपंच सागर अभंग यांच्या वतीने ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले.
शासकीय निधीतून एकच वर्गखोली मंजूर असताना, पालक आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून दुसरी वर्गखोली उभी केली, हे कौतुकास्पद असल्याचे धीरज अभंग म्हणाले. त्यांनी शिक्षक रवींद्र परमाळे आणि रेश्मा कोरडे यांचे विशेष कौतुक केले, ज्यांच्या मेहनतीमुळे शाळेतील विद्यार्थी सैनिक स्कूल आणि नवोदय सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत.
ग्रामपंचायतीने दिलेल्या इंटरॲक्टिव्ह पॅनेलमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांप्रमाणेच डिजिटल शिक्षण मिळेल, असे मत कुंदन शेंडे यांनी व्यक्त केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध भाषांमधून भाषणे सादर केली.
या कार्यक्रमाला सदस्य सचिन अभंग, सुरेश मुळीक, सहदेव शेंडे, कुंदन शेंडे, योगेश इंगळे, अंकुश नाळे, ॲड. अविनाश अभंग, दिलीप अभंग, ग्रामविकास अधिकारी अंकुश टेंबरे आणि मुख्याध्यापक राजाराम तांबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उपशिक्षक रवींद्र परमाळे यांनी मानले.