हे जर कर्तव्य तर प्रसिध्दीची धडपड कशाला अवाढव्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now



स्थैर्य, कोळकी, दि. २८ (राजेंद्र पोरे): माझं घ्या आन् मला पाचांत न्या… अशी एक म्हण आहे. सध्याच्या अनेक रेडिमेड सु…शिक्षितांना ही म्हण माहिती सुध्दा नसेल. सोशलमिडियावर एक पोस्ट सध्या फिरतेय की, कोरोनाने सार्‍या जगाला जागच्या जागी थांबवले पण तो राजकारण नाही थांबवू शकला. येथेही तो हरला. हे जे कोणी लिहले ते खरेतर वास्तवच आहे. लोकशाहीच्या नावाखाली सध्या जो दिल्ली ते गल्ली राजकारणाचा उच्छाद सततच सुरु असतो ते पाहता या म्हणीची आठवण येते. एखाद्या राजकीय नेत्यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी एखादी पोस्ट टाकली की, निष्ठावंतांची आपापली निष्ठा सिध्द करण्यासाठी चढाओढ सुरु होते. त्याच त्या पोस्ट प्रत्येकजण प्रत्येक ग्रुपवर परत परत पोस्ट करत असतात. हे मी किती निष्ठावान हे सिध्द करण्याच्या नादात निष्ठेच्या नावाखाली विष्ठा चिवडतात आणि त्याचे सडाशिंपण सर्वत्र करतात की काय? असा किळसवाणा प्रकार सुरु असतो. तेच ते म्हटल्यानंतर बहुतांश ग्रुप सदस्य त्याकडे ढुंकूणही पहात नाहीत. पण काही महाभागांचा हात थांबत नाही. याला वैतागून अनेकजणांनी असे मत व्यक्त केले की, एवढाच जर प्रसिध्दीचा कंड असेल तर आपला एक ब्लॉग अथवा ग्रुप तयार करावा व त्याला किती प्रतिसाद असतो त्यावरुन आपले मुल्यमापन करावे म्हणजे आपली लायकी व पात्रता लक्षात येईल. पण हे लक्षात घेतो कोण? दिसली पोस्ट की हाण लाईक आन् कर शेअर पण आता वाचक मात्र त्याला डावलून पुढे जातो.

राज्यभरात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. डॉक्टर्स,पोलिस,आरोग्य कर्मचारी अहोरात्र कर्तव्य करत आहेत. त्याचबरोबर शासनासह अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते हे सुध्दा लॉकडाऊनमुळे अन्नधान्या अभावि हाल होणार्‍या गरजू गोरगरिबांना अन्नधान्य,तेल,भाजी आदी प्रकारच्या किटद्वारे यासह अन्नछत्रातून मदतीचा हात देत आहेत. अनेकजण आपापल्या परीने यात निस्वार्थीपणे मदत करत आहेत पण सोशलमिडियाद्वारे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात काही स्वयंभू उठवळांनी धुमाकूळ घातला आहे. खरेतर एका हाताने दिलेले दान दुसर्‍या हाताला कळू देऊ नये ही आपली संस्कृती आहे. परंतु काही ठिकाणी या दानशूर…? दात्यांच्या कार्यकर्त्यांची,मित्रांची सोशलमिडियावर चढाओढ सुरु आहे. याचे शेकडो ग्रुपवर हजारो फोटोंद्वारे उदात्तीकरण सुरु आहे. हे कशासाठी? आपण जर सामाजिक भावनेने करत आहोत तर दान घेणार्‍या बरोबरच समाजालाही हे ते कळल्याशिवाय रहात नाही. माध्यमे स्वत:हून याची दखल घेऊन कौतुकास्पद कामगिरी समाजासमोर आणत असतात. परंतु आजकाल सोशलमिडिया सारख्या समाज माध्यमांतून  एकमेकांवर कुरघोडी करण्याची चढाओढ लागलेली आहे. केलेल्या दानापेक्षा त्याची प्रसिध्दी अवाढव्य झालेली आहे. कोणतीही आपत्ती असेल तरी त्यात हौसे,गवसे,नवसे आणि संधीसाधूंची जत्रा ठरलेलीच असते.  समाज कार्यातून अपेक्षा काय आणि आपण जागरण गोंधळ मांडून डांगोरा पिटतोय कोणता हे या सुशिक्षित म्हणवणार्‍यांना समजतेय का असा प्रश्‍न आहे.

यामुळेच आता सोशलमिडियावरील जाणत्या माणसांनी वाचकांनी कोणती पोस्ट वाचायची व कोणती टाळायची हे ठरवून टाकलेले असते. याचा परिणाम असा होतो की सतत प्रत्येक ग्रुपवर माझं बघा…माझंच बघा म्हणत जो पोस्टचा रतीब घातलेला असतो त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याने केलेली एखादी चांगली सामाजिक संदेश अथवा माहिती,बातमी देणारी पोस्टही पोस्ट करणार्‍याच्याच पुर्वीच्या उठवळ अनुभवामुळे वाचकांपर्यंत पोहोचत नाही. थोडक्यात ठराविक प्रेक्षकांच्या तत्कालिक करमणूकीसाठी काही अभिनेत्यांनी उठवळ गाणी व कथानक नसलेले चित्रपट केले. परंतु वास्तवता लक्षात आल्यानंतर प्रेक्षकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली यामुळे त्याच अभिनेत्याच्या अभिनय संपन्न चित्रपटालाही प्रेक्षकांअभावी सपाटून मार खावा लागला अशी उदाहरणे आहेत. त्यातच अनेक पर्याय उपलब्ध असल्याने वाचकच आपली आवडनिवड पसंत करतो. माझं घ्या म्हणत कितीही लादले तरी तो दुर्लक्ष करतो. अनेक सुज्ञ तर या उठवळांच्या अतिरेकाला वैतागून त्या ग्रुपमधूनच बाहेर पडणे पसंत करतात. याकडे आता माझीच लाल म्हणणार्‍यांनी लक्ष देऊन हे टाळणे आवश्यक आहे. कारण कितीही साळसूद सज्जनपणाचा आव आणला तरी समोरचा काय स्विकारायचे व काय टाळायचे हे ओळखून असतो. प्रतिभावंतांची प्रतिमा त्याला माहित असते. मीच श्रेष्ठ आणि माझंच बेस्ट म्हणत प्रतिभावंतांना कोणाच्या दारात कटोरा घेऊन फिरायची आवश्यकता भासत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे या आपत्तीकाळाने आख्या जगालाच जमिनीवर आणलेले आहे. अशा प्रसंगी प्रसिध्द गझल गायक अजीज नाझा यांची एक सुप्रसिध्द कव्वाली आठवते.

आज समझ ले कल ये मौका हाथ न तेरे आएगा…

ओ गफलत की निंद मे सोने वाले धोका खायेगा…

चढता सूरज धीरे..धीरे..ढलता हैं ढल जाएगा….


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!