सर्व क्षेत्रात नवसंशोधन झाल्यास देश प्रगतीची शिखरे सर करील – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । मुंबई । नवीनता, शोध व संशोधनाची कास सोडून केवळ इतरांचे अनुकरण केल्यामुळे देशाची पीछेहाट झाली. मात्र नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवीनता व नवसंशोधनावर भर देताना आंतर शाखीय अध्ययनाला महत्त्व दिले आहे.  केवळ विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात नवसंशोधन न होता ते कला व मानव्यशास्त्र विषयात देखील झाल्यास आज पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असलेला भारत प्रगतीची नवी शिखरे सर करेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्य शासनाने नव्याने स्थापन केलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या दीक्षांत समारंभाला राज्याचे माजी लोकायुक्त न्या. मदनलाल टहलियानी, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रजनीश कामत, कुलसचिव प्रा. युवराज मलघे, संचालिका परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ विजया येवले, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे, सिडनहॅम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ माधुरी कागलकर तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकार मंडळांचे सदस्य तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

आज देशात  संपूर्ण स्वदेशी बनावटीची हेलिकॉप्टर व विमाने निर्माण होत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये देखील आमूलाग्र संशोधन होत आहे. या पार्श्वभूमीवर स्नातकांनी मोठे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून कठोर परिश्रम, निर्धार, समर्पण भावना व शिस्तीने काम केल्यास कोणतेही लक्ष्य प्राप्त करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

डॉ. होमी भाभा यांच्या योगदानाचा गौरव करताना विद्यार्थ्यांनी डॉ. भाभा यांच्या प्रमाणे विलक्षण कार्य केल्यास पुढील २० वर्षात विद्यापीठाच्या उत्तम माजी विद्यार्थ्यांचे प्रभा मंडळ तयार होईल असे राज्यपालांनी सांगितले.

भ्रष्टाचार ही कीड असून ती समूळ नष्ट करण्यासाठी नैतिक मूल्ये बळकट करणे आवश्यक आहे याचा विचार करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जीवन मूल्य व संस्कारांना महत्त्व देण्यात आले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

दीक्षांत समारंभात सुवर्ण पदक विजेत्यांमध्ये ९० टक्के मुली असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना आगामी काळात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर होतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त  केला.

आपल्या दीक्षांत भाषणात  माजी  लोकायुक्त न्या. मदनलाल टहलियानी यांनी, विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी व कुटुंबासाठी अर्थार्जन करताना सेवा, त्याग व इतरांचे हित ही मूल्ये जपल्यास कामाचे समाधान मिळेल व समाजाचे हित देखील साधेल असे सांगितले.

दहशतवादी अजमल कसाब यांच्यावरील खटला आपण विक्रमी गतीने चालविला व कमी वेळेत निकाल दिला कारण या खटल्यामध्ये प्रत्येक दिवसागणिक देशाचे करोडो रुपयांचे नुकसान होत होते, असे त्यांनी सांगितले.

भ्रष्टाचार हा कर्करोग असून प्रत्येकाने किमान आपण स्वतः भ्रष्टाचार करणार नाही हा निर्धार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचा अहवाल सादर करताना कुलगुरू प्रा. रजनीश कामत यांनी डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाची स्थापना  हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी दूरदर्शी निर्णय असल्याचे सांगितले.

विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महर्षी कर्वे, डॉ. होमी भाभा, रँग्लर व्ही. व्ही. नारळीकर, अर्थतज्ज्ञ दीपक पारेख यांसारखे स्नातक निर्माण झाले असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठ आणि ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली असून बॅचलर ऑफ सायन्स इन डाटा सायन्स हा अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षांत समारंभात ४१३ स्नातकांना पदवी देण्यात आली तसेच १३ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!