
स्थैर्य, सातारा, दि. २७ : राज्यात महाआघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन केले. ते या परिस्थितीत योग्य नव्हते. महापुराचे राजकारण करू नका, असे ते म्हणत होते. त्यांनी आपले शब्द आठवावेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थव्यवस्था रूळावर येणार नाही. राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेवरून भारतात अराजकता आल्यास त्यास सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असतील, असा गर्भित इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
राज्यातील महाआघाडीचे सरकार स्थिर आहे. ते अस्थिर करून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न कोणी केल्यास ते दुर्देवी ठरेल, असे सांगून चव्हाण पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीवरून झालेला वाद, संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य अशा ज्या काही घडामोडी घडताहेत, त्यावरून राज्यपालांच्या भूमिकेविषयी आमच्या मनात शंका आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काही सल्ला सरकारला दिला असेल तो गैर नाही. सरकार स्थिर आहे. ते चालू द्या. परिस्थिती सोपी राहिलेली नाही.जगभरात कोरोनावर लस, औषध शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यास यश आलेले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत प्रतिबंधात्मक उपायांवरच भर दिला पाहिजे. लस निर्माण झाली तरी उद्याच मिळेल, अशी स्थिती नाही. प्रत्येक देश प्रथम आपल्या देशात लसीचा उपयोग करून मग दुसऱया देशाला देणार आहे. लस आली तर भारतात त्याचे 100 टक्के लसीकरण करावे लागणार आहे. काहीही झाले तरी डिसेंबर 2021 आत कोरोनाचे संकट संपणार नाही. एचआयव्ही गेली 40 वर्षे आहे. मात्र त्यावर अजून औषध आलेले नाही. त्यामुळे कोरोनावर लगेच औषध येईल, असे कोणी समजू नये, असे चव्हाण म्हणाले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच पत्रकार परिषदा घेऊन जे पॅकेज जाहीर केले आहे, त्यामुळे आमची घोर निराशा झाली आहे. देशात मागणी व पुरवठा या दोन्ही बाजू कोलमडलेल्या आहेत. या परिस्थितीत देशातील मजूर, शेतकरी, नोकरदार यांना रोख पैसे दिले पाहिजेत. अमेरिका, इंग्लंड, जर्मनीने आपल्या प्रोत्साहनपर पॅकेजमध्ये रोख डॉलर्स दिले आहेत. भारतात मात्र सरकारने रोख पैसे देण्याचे अजून नाव काढलेले नाही. उद्या काय होणार याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे लोकांचा कल जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याकडे आहे. इतर वस्तू लोक खरेदी करणार नाहीत. त्यामुळे रोख पैसे दिले तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने लागेल तेवढे कर्ज काढावे, नोटांची छपाई करावी, सोने विक्री यास प्राधान्य द्यावे. महाराष्ट्रातून मजुरांसाठी जास्तीत जास्त ट्रेन गेल्या आहेत. यावरून सुरू झालेले राजकारण दुर्देवी असल्याची टीका त्यांनी केली. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही जागतिक महामारी घोषित केली आहे. यात राज्यसरकार अथवा कोणा व्यक्तीचा संबंध नाही. त्यामुळे या महामारीचा सामना करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने उचलली पाहिजे. राज्य सरकारांना सहकार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी मनोहर शिंदे, शिवराज मोरे उपस्थित होते.
देशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट झाली पाहिजे, असा आपला आग्रह आहे. मुख्यमंत्री असताना कराडच्या उपजिल्हा रूग्णालयाला कोटय़वधी रूपयांचा निधी देऊन निवासस्थाने व साधनसामुग्री उपलब्ध करून दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रूग्णालयात नव्याने सुविधा निर्माण करण्यासाठी आपल्या आमदार निधीतून माझी 1 कोटी रूपये देण्याची तयारी आहे, असे जिल्हाधिकाऱयांना सांगितले आहे, असे चव्हाण म्हणाले.
व्हायरल झालेल्या क्लीपबाबत स्पष्टीकरण देताना चव्हाण म्हणाले की, त्या क्लीपमधील आवाज माझाच आहे का, हे खात्रीने सांगू शकत नाही. मी तसे बोललो किंवा नाही, हेही मी सांगणार नाही. त्या कार्यकर्त्याने शेतकरी आत्महत्येबाबत मदत मिळण्याबाबत चर्चा केली होती. मी याबाबत सरकारशी बोलतो, शिफारस करतो, असेही मी म्हटले होते. राजकारणात अशा गोष्टींना तोंड द्यावे लागते. कुणीतरी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मला काहींनी फोन करून सावधही केले होते, असे चव्हाण म्हणाले.