दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील जनतेने मला निवडणून दिलेले आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांनी फलटण तालुक्याचा विकास साधण्यासाठी मला निवडून दिलेले आहे. तालुक्यातील विकासकामे करण्यासाठी माझा नेहमीच पुढाकार होता, आहे व या पुढे सुद्धा राहणार आहे. मला व माझ्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्यापेक्षा जर तुमच्यात हिमंत असेल तर माझ्या विरोधात लोकसभा निवडावी, असे थेट आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना एका कार्यक्रमात दिले आहे.
फलटण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला व माझ्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मी कच्च्या गुरुचा चेला नाही, मी लढवय्या हिंदुरावचा मुलगा आहे. कोणालातरी पुढे उभे करुन खोट्या केसेस मध्ये अडकवून मला दाबण्याचा प्रयत्न करु नका. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल. आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. मी व आमच्या कार्यकर्त्यांनी विरोधी गटाच्या कोणत्याही कार्यकत्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु माझ्या कार्यकर्त्यांना कोणाला तरी सांगुन केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा टोलाही यावेळी खासदार रणजितसिंह यांनी यावेळी लगावला.