महाराष्ट्राला उद्योगक्षेत्रात अग्रस्थानावर आणण्यासाठी धोरणबदलांची आवश्यकता असल्यास उद्योगांच्या सूचना घेऊ – उद्योगमंत्री उदय सामंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । पुणे । महाराष्ट्राला उद्योगक्षेत्रात अग्रस्थानावर आणायचे असून त्यासाठी औद्योगिक धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्यास उद्योगांच्या सूचना घेऊन धोरणबदलांसाठी निश्चित प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्य शासन उद्योगांच्या खंबीरपणे पाठिशी असून उद्योगांच्या वाढीसाठी सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातील असेही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) विद्यमाने पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मध्ये आयोजित ‘पुणे मनुफॅक्चरींग एक्स्पो २०२२- पुणे डीफटेक’ प्रदर्शनाला श्री. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री. सामंत बोलत होते. यावेळी  आमदार महेश लांडगे एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते.

पुणे ही ज्याप्रमाणे शिक्षणाची पंढरी आहे तसेच उद्योजकांची पंढरी देखील पुणेच आहे, असे सांगून श्री. सामंत म्हणाले, उद्योजकांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत यासाठी आपण राज्यातील सर्व एमआयडीसीमध्ये उद्योगांना भेटी देत आहोत. राज्य शासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि उद्योजकांमध्ये संपर्क असला पाहिजे. प्रत्यक्ष भेटीतील चर्चेमुळे त्यांच्या समस्या, अडचणी लक्षात येतात. त्यानुसार धोरणांमध्ये आवश्यकतेप्रमाणे शिथीलता आणण्याबाबत विचार केला जातो, असे श्री. सामंत म्हणाले.

राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुणे जिल्ह्यासाठी नुकताच २ हजार कोटी रुपयांचा इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर घोषित केला. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील  ही बैठक घेण्यात आली, त्यामध्ये उद्योगांसाठी भरीव सवलती जाहीर केल्या. औद्योगिक सवलतींचा कालावधी २० वर्षावरुन वाढवून ४० वर्षाचा केला. उद्योगांच्या सवलती ६० टक्के ऐवजी १०० टक्के केल्या. त्याचा परिणाम म्हणून १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक रायगडमध्ये करण्यास एक उद्योग तयार झाला.

राज्य शासन उद्योगांच्या वाढीसाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी उद्योगांना सोई सुविधा, सवलती देण्यासाठी तयार असून येथील उद्योगांनी आहेत त्यापेक्षा दुप्पट रोजगार देण्याची भूमिका ठेवली पाहिजे. हे करत असताना स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. उद्योगांची वाढ होत असताना परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा वाढत असतात. त्याप्रमाणेच तेथील तरुणांनाही रोजगार मिळाल्यास अशा उद्योगांच्या मागे तेथील स्थानिक युवक उभे राहतील, असेही श्री. सामंत म्हणाले.

श्री. सामंत पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हायड्रोजन धोरण राज्याने करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच हे धोरण लागू करण्यात येईल. हे करताना सर्व सुरक्षा मानकेही लक्षात घेऊन काम केले जाईल. माहिती तंत्रज्ञान धोरण, वाईन पॉलिसी देखील लवकरच मार्गी लावले जाईल.

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात भेटी देत असताना तळेगाव, चाकण येथे ट्रक टर्मिनल नसल्याचे लक्षात येताच शासनाने तात्काळ ट्रक टर्मिनलला मंजुरी दिली. तळेगाव येथील पुष्प पार्कमध्ये कंपन्या उभारण्यासाठी (फ्लोरीकल्चर पार्क) रासायनिक कंपन्यांसाठीचे निकष होते. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना अडचणी येत होत्या. ते बदलण्यात येणार आहे. उद्योगांच्या प्रकार, स्वरुपानुसार त्यांचा अभ्यास करुन निकष निश्चित करण्यात येतील जेणेकरुन उद्योगांची वाढ आणि रोजगारवृद्धी होईल, असेही उद्योगमंत्री म्हणाले.

यावेळी श्री. करंदीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशांत गिरबने यांनी आभार मानले. कार्यक्रमास उद्योजक आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उद्योगमंत्री श्री. सामंत यांची ‘पुणे मनुफॅक्चरींग एक्स्पो २०२२- पुणे डीफटेक’ प्रदर्शनाला भेट देऊन कंपन्यांच्या दालनांची पाहणी करुन माहिती घेत संवाद साधला.


Back to top button
Don`t copy text!