स्थैर्य, मुंबई, दि. 18 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे विधानपरिषदेसाठी नाव निश्चित झाल्यावर स्वाभिमानीतील काही नेते नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. यामुळे राजू शेट्टी यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आजपर्यंत मी अनेक प्रसंगांना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरून झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरून येतात, पण घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी लागतात. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करून पाठवायच्या आहेत त्यापैकी एका जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्वीकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करून कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले.
जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरून चर्चा करावी असे सुचवले. 12 जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक,पक्षाचे अध्यक्ष जालिंदर पाटील यांच्यासहीत जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते. इतर सर्व सदस्यांशी फोनवरून चर्चा करून त्यांचे मत आजमावले गेले आणि एकमताने आघाडीचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरले. माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिकार्यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणीवपूर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिकार्यांनी माझ्या नावाबाबत एकमत केले व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले. तो निरोप घेऊन मी 16 जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार यांना पक्षाचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार सांगितला.
आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेशकारक आहे. गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे.