केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत अडीअडचणी असल्यास त्वरित कळवा – पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । चंद्रपूर । केंद्र सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना राज्यांमार्फत चालविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मात्र यात काही अडचणी निर्माण होत असतील, तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात. जेणेकरून संबंधित यंत्रणेशी बोलून त्या सोडविल्या जातील व त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले.

नियोजन सभागृहात केंद्रीय योजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम आदी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये विविध विभागामार्फत केंद्र पुरस्कृत योजना राबविल्या जातात, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. पुरी म्हणाले, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जेथे कुठे अडचण निर्माण होत असेल, अशा बाबी विभाग प्रमुखांनी तात्काळ निदर्शनास आणून द्याव्यात. जेणेकरून संबंधित यंत्रणेशी बोलून त्यावर तोडगा काढता येईल. केंद्र सरकारने दिलेला 15 व्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च केला, काही निधी शिल्लक आहे का, आदींबाबत त्यांनी विचारणा केली.

कोणत्याही योजनेच्या तीन – चार ठळक मुद्यांवरच चर्चा व्हायला पाहिजे. सर्व योजना सांगत बसणे योग्य नाही. या योजनांची माहिती संबंधित मंत्रालयाकडे असतेच. योजनेचे जे उद्दिष्ट कार्यान्वयीन यंत्रणा पूर्ण करू शकली नाही, त्याबाबत अधिका-यांनी माहिती द्यावी. जेणेकरून त्यावर लक्ष केंद्रीत करून त्याची सोडवणूक करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता शहरी स्वराज्य संस्थेला थेट निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचे योग्य नियोजन करावे. पुढील भेटीत यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला जाईल. त्यामुळे अधिका-यांनी पूर्ण तयारीने आणि ठळक मुद्यांवर चर्चा करावी, अशा सुचना केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या.

यावेळी मनपा, जिल्हा परिषद यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचे सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

शेतक-यांना बियाणे वाटप : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत कृषी विभागातर्फे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते शेतक-यांना ज्वारीच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. यात चकबोर्डा येथील गौतम सागोरे, बोर्डा येथील सुधाकर खोब्रागडे, पिपरी येथील देविदास देवतळे, देविदास येरगुडे आणि बेलसनी येथील आकाश पोले यांचा समावेश होता.


Back to top button
Don`t copy text!