दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२३ । पुणे । ‘अजितदादा हे कुठेही जाणार नाहीत. तुमच्या घरात जर बायको रूसली, तर ती घरातून निघून जाते की रूसून बसते ? तसेच आहे की, दादा हे आता विधानभवनलाच आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत,’ असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.
वेताळ टेकडी पाहण्यासाठी सुळे या टेकडीच्या पायथ्याला आल्या होत्या. त्यांनी वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्यांसमवेत टेकडीची पाहणी केली. त्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादीत नाराजी असेल, पण कोणीही कुठे जात नाही. सर्व आमदारांशी, खासदारांशी मी बोलतेय. एखादा कोणी नाराज असेल, तर आमच्या कानावर आले असते. तुमच्या घरात बायको नाराज झाली, तर सोडून जाते की रूसते ? तसे काहीही नाहीय. तुम्हा मीडियाकडूनच मी ऐकतेय की, ते नाराज आहेत. खरंतर आता विधानभवनात आहेत. तुम्ही चेक करा. तुम्ही म्हणता ते खूप बोलत नाहीत. तर दादा कधी जास्त बोलतात. पवारसाहेब एक गाेष्ट नेहमी सांगतात की, कमी बोलावे, तोच यशस्वी होतो.’’
राष्ट्रवादी पक्षातील काही लोकं ईडीच्या भितीने तणावाखाली आहेत आणि म्हणून तेच दादांबाबत वावडे उठवत आहेत का? या प्रश्नांवर सुळे म्हणाल्या,‘‘ मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. दर तासाला काय होते, त्याला मला माहित नाही. मी टीव्ही पाहत नाही. वृत्तपत्रे वाचते. त्यामुळे चॅनलवर काय चाललेय ते माहित नाही.’’