दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२३ | फलटण |
वाखरी (ता. फलटण) येथील छ. शिवाजी हायस्कूलची इमारत दुरूस्त करणे किंवा नवीन इमारत उभारण्यास आम्ही एका पायावर तयार आहोत. मात्र, सदरची जागा वनविभागाच्या मालकीची असून वनविभाग दुरूस्ती करू देत नाही. वनविभाग आमच्यावर गुन्हे दाखल करत आहे. ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांनी पर्यायी जागा दिल्यास आम्ही नवीन इमारत तात्काळ उभारतो, असे स्पष्टीकरण श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी दिले आहे.
वाखरी येथील छ. शिवाजी हायस्कूल या शाळेची इमारत जुनी झाल्याने तिची पडझड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना संस्थेचे सचिव सचिन सूर्यवंशी(बेडके) बोलत होते.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी ही संस्था फलटण तालुक्यात नावाजलेली संस्था असून वाखरी येथील शाळेची इमारत ग्रामस्थांच्या सहकार्याने १९६२ साली उभारलेली आहे.सध्या शाळेची इमारत जेथे उभी आहे, ती जागा वनविभागाची असून तेथे नवीन इमारत उभी करण्यासाठी वनविभाग परवानगी देत नाही. वनविभागाची जागेसंबंधी अडचण असल्याकारणाने आम्हास तेथे सर्व सोईंनीयुक्त नवीन इमारत उभारणे किंवा आहे त्या इमारतीची दुरूस्ती करणे किंवा मजबुतीकरण करणे इ. गोष्टी जिकीरीच्या होऊन बसल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षणाबरोबरच मूलभूत अशा स्वच्छतागृह, व्यायामशाळा, वाचनालय, प्रयोगशाळा आदी प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास असक्षम ठरत आहोत, असे सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी सांगितले.
यापूर्वी आम्ही २०१९ मध्ये इमारत दुरूस्तीचा आणि नवीन खोल्या बांधण्याचां प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी वनविभागाने आम्हा सर्वांवर गुन्हे दाखल केले होते. शाळेसाठी ग्रामपंचायतीने किंवा कोणी खाजगी व्यक्तीने जागा दिल्यास आम्ही त्या जागेवर नवीन इमारत उभारण्यास तयार आहोत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी गावपातळीवर सर्वांनी एकत्र येऊन जागेचा तिढा सोडवावा, आम्ही त्वरित इमारत उभारतो, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी सातारा, उपवनसंरक्षक सातारा इ. शासकीय कार्यालयांकडे आमच्या संस्थेमार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याचा सतत कागदोपत्री व समक्ष पाठपुरावा करण्यात येत आहे, असे सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी यावेळी सांगितले.