
स्थैर्य, मुंबई, दि. १०: आदिवासी समाजातील सरकारी कर्मचारी, अधिकऱ्यांना त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आणि माझ्या पक्षाशी आहे अशी संतप्त प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी दिली आहे. व या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना इमेल द्वारे निवेदन पाठवले आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, चांदूरबाजार, जिल्हा अमरावती येथील भूमी अभिलेख विभागात गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या भूमापक दीक्षा शिवलाल उईके या आदिवासी महिलेचा त्यांच्याच विभागातील उपअधिक्षक राजू घेटे यांनी प्रचंड मानसिक छळ चालवला आहे. जातीवाचक अपशब्द उच्चारणे, खोटे आळ घेणे, पगार रोखून धरणे, शेतकऱ्यांना त्यांच्या विरुद्ध तक्रारी करायला लावणे अशा अनेक प्रकारे त्यांना त्रास दिला जात आहे. या त्रासाला कंटाळून त्यांनी दि. ०५ मार्च २०२१ रोजी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. तो फसल्यावर पोलीसात तक्रार केली. पण त्यामुळे त्रास कमी न होता उलट अधिकच वाढला आहे. दीक्षा उईके यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार या सर्वांना निवेदन देऊन काहीही उपयोग झाला नाही. हे सगळे भयंकर आहे. अशा प्रकरणात दुसरी दिपाली चव्हाण महाराष्ट्रात होऊ द्यायची नसेल तर त्वरित या प्रकरणाची दखल घ्यावी असे आमदार निकोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे निवेदन पाठवून मागणी केली आहे.
तसेच राज्यात सरकारी आदिवासी कर्मचारी व अधिकारी यांना त्रास देण्याचे प्रकार होत आहेत. असा त्रास दिल्यास तो सहन केला जाणार नाही. व हे वेळीच थांबले पाहिजे अन्यथा गाठ माझ्याशी आणि माझ्या पक्षाशी आहे असा आक्रमक पवित्रा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी घेतला आहे.