रेशन कार्डधारकांनी आधार लिंक न केलेस धान्य बंद होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । सातारा । अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयामार्फत धान्य वितरण करण्यात येते. अन्नधान्य वितरण प्रणालीच्या विविध अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांतील लाभार्थ्यांचे आधार सीडिंग करावयाचे प्रलंबित आहे. शासन स्तरावरून सततच 2 वर्षे पाठपुरावा करूनही १०० टक्के आधार सीडिंग होत नसल्याने रास्त भाव दुकानदारांमार्फत ई – पॉस मशीनद्वारे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण प्रणालीचे १०० टक्के आधारचे व ई – केवायसीचे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जे नागरिक रेशन धान्याचा लाभ घेतात मात्र रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे  आधार कार्ड  आतापर्यंत लिंक करून घेतले नाही, अशा आधार लिंक नसलेल्या नागरिकांचे रेशन धान्य बंद करावे लागणार आहे.  रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी लाभार्थींनी स्वत: रेशन दुकानात आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जाऊन जोडणी करून घ्यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी आवाहन  केले.

रेशनकार्डला आधार लिंक केलेल्या नागरिकांची संख्या लक्षणीय असली तरी सर्वांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी ही मोहीम सुरू आहे. सातारा जिल्ह्यात रेशन कार्ड शी आधार लिंकची टक्केवारी ९३.३७ असून अद्यापही १ लाख 18 हजार 478 नागरिकांचे आधार कार्ड लिंक होणे बाकी आहे. सदर आधार लिंकींग प्रलंबित असण्याची कारणे सबंधित लाभार्थी मयत,दुबार, स्थलांतरित  असू शकतात. अशा व्यक्ती प्रत्यक्षात नसुनही त्यांना धान्य अदा केले जाते. तरी हे मयत,दुबार, स्थलांतरित यांची नावे कमी करून नविन गरजू,गरिब लोकांना संधी देण्यासाठी प्रशासनाने ही विशेष मोहिम सुरू केली आहे. तसेच लहान मुले, वयोवृध्द लोकांचे आधार जुळत नाही अशांसाठी तहसिल कार्यालयाद्वारे आधार अपडेशन साठी कॅम्प लावणेच्या सुचना तहसिलदारांना दिल्या आहेत.

तरी सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी रेशनकार्डला आधार जोडणेचे आवाहन करणेत येत आहे.यासाठी लाभार्थीनी सबंधित स्वस्त धान्य दुकान अथवा सबंधित तहसिल कार्यालयांना संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!