दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । सातारा । राज्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक असल्याची बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्यामुळे राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाच्या 11 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार अशा सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून अशा जातीवाचक नावा ऐवजी महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचित केले असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली आहे.
ग्रामविकास विभागाचे शासन परिपत्रक 28 एप्रिल 2021 नुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून नवीन नावे देण्याची कार्यपद्धती दिलेली आहे. त्यानुसार संबंधित गावाचे ग्रामसवेक, ग्रामविकास अधिकारी यांनी येत्या प्रजासत्तादिनाच्या ग्रामसभेमध्ये ठरात संमत करुन प्रस्ताव पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद, सातारा येथे सादर करावा व जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ठराव एकत्रित करुन विभागीय आयुक्त कार्यालयास पुढील कार्यवाहीस्तव सादर करावेत. या प्रक्रीयेत जिल्ह्यातील जातीवाचक नाव असेलेली कोणतेही गाव, वस्ती व रस्ता या पासून दुर्लक्षित राहणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात यावी. तसेच जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही 15 दिवसात करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हास्तरीय समितीस सादर करावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.