दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२३ । मुंबई । अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा तसेच वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धेच्या पाण्यामुळे बुडीत क्षेत्राव्यतिरिक्त इतर शेत जमिनीचे नुकसान होत असेल, तर अशी जमीन अधिग्रहीत करण्याचा विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य दादाराव केचे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की,अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा प्रकल्पामुळे काही गावातील जमिनीचे नुकसान झाले आहे. त्यांना मदतही केली जाते. परंतु अनेक ठिकाणी वारंवार या पाण्यामुळे शेतजमिनीचे नुकसान झाल्याच्या आणि तिथे शेती करता येत नसल्याच्या तक्रारी येतात. वारंवार जमिनीचे नुकसान होत आहे. त्या जमिनींचे शासनाने अधिग्रहण करावे, अशी मागणी होत आहे. बुडीत क्षेत्राच्या अपेक्षित क्षेत्रापेक्षा जे अधिक क्षेत्र बुडीत जात आहे किंवा शेतकऱ्यांची जमीन शेती करण्यासाठी सारखी राहत नाही. याबाबत राज्य शासनाने यापूर्वी दोन शासन निर्णय जारी केले आहेत. त्यानुसार निर्णयानुसार अटी व शर्ती तपासून या जमिनी अधिग्रहण करण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदी दुथडी भरून वाहते तेव्हा सिंभोरा, येवती, भांबोरा या गावात शेतीचे नुकसान होते. मागील वर्षात नुकसान झालेल्या 30 लोकांनी नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तसेच या लोकांच्या पुनर्वसनाबाबत जिथे पुनर्वसन करणे आवश्यक आहे ते पुनर्वसन प्राधिकरणामार्फत पुनर्वसन केले जाईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या लक्षवेधी सूचनेवेळी झालेल्या चर्चेत विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी सहभाग घेतला.