
स्थैर्य, मुंबई, दि.२८: ‘शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून भाजपसोबत यावे आणि शिवसेना येत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत यावं, असे मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. अभिनेत्री पायल घोष कथित अत्याचार प्रकरणीही त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
यावेळी आठवले म्हणाले की, ‘संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. शिवसेनेने कॉंग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून शिवसेना-भाजप-आरपीआयचे सरकार बनवावे. उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील. उर्वरीत तीन वर्ष देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्यावे. पण, जर शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी भाजपसोबत एकत्र यावे आणि सरकार स्थापन करावे’, असे आठवले म्हणाले.
पायलला पोलिस संरक्षणाची गरज
पुढे आठवले म्हणाले की, ‘अभिनेत्री पायल घोषसोबत अर्धातास चर्चा केली. काहीवर्षांपूर्वी पायलवर अनुराग कश्यप यांनी अत्याचार केला होता. या प्रकरणी मी विश्वास नांगरे पाटील, अभिषेक त्रिमुखे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे सांगितले आहे. आमचा पोलिसांच्या चौकशीवर विश्वास आहे, मात्र एवढा उशीर लागत असताना कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न आहे. अनुराग कश्यप मुंबईतच आहेत. तरीही त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं नाही. पायलला आपल्या जिवाची भिती आहे. तिने पोलिस संरक्षण मागितले आहे. याबाबत मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणार आहे,’ असे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.