दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
मी १९८२ पासूनचा (पूलोद) समाजवादी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. १९८४ चे लोकसभा उमेदवार कै. दादाराजे खर्डेकर, १९८५ चे कै. बॅ. राजाभाऊ भोसले विधानसभा, १९९० चे कै. सुभाषराव शिंदे विधानसभा व १९९५ पासून श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर महाराज यांच्या नगरपालिका ते विधानसभा निवडणुकीत एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक पक्षाचे काम केले आहे. या कार्याची जाण फलटण तालुक्यतील वयोवृध्द मतदारांना व तरुण मतदारांनाही आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे फलटण-कोरेगाव विधानसभेसाठी उमेदवारी मागितली आहे. परंतु पवारसाहेबांनी मला उमेदवारी न दिल्यास जनताच मला न्याय देईल, असे प्रतिपादन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक असलेले सूर्यकांत मा. शिंदे यांनी केले आहे.
शिंदे म्हणाले की, मी माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा व्हावा व त्यांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचे एकनिष्ठ काम केले आहे. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी १९८४ साली (पूलोद) ‘चरखा’ या निशाणीवर फलटण नगरपालिका निवडणूक लढवली आहे. खासदार शरद पवार, आमदार रामराजे ना. निंबाळकर यांचे विचार मानणारा कार्यकर्ता आहे. वरील जे मी माझ्या वयाच्या २७ वर्षांपासून कार्य केले ते आता वयाच्या ६८ वर्षापर्यंत करीत आहे.
शिंदे पुढे म्हणाले की, योगायोगाने २००९ रोजी फलटण विधानसभा मतदार राखीव झाला व मी मागासवर्गीय विरशैव कंकय्या ढोर समाजाचा (एस.सी.) असल्याने २००९/ २०१४/२०१९ पासून उमेदवारी मागत आहे. प्रत्येकवेळी मी पक्षनिधी भरून मुलाखती दिल्या आहेत; परंतु मला तिन्ही वेळेला न्याय मिळाला नाही. आता २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा पक्षनिधी भरून शरद पवार यांच्याकडे न्याय मागितला आहे. मला न्याय मिळेल अशी आशा आहे. अन्यथा मला जनताच (मतदार राजा) न्याय देईल, अशी आशा करतो.