दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । फलटण । कोरोनाच्या भीषण कालावधीमुळे फलटण शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन हे अत्यंत हलाखीचे झालेले आहे. कोरोनाच्या काळामुळे फलटण शहरातील सर्वसामान्य नागरिक हे घरपट्टी भरण्यास सक्षम नाहीत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मध्ये जर घरपट्टी माफ केली जात असेल तर फलटण सारख्या निमशहरी शहरामध्ये सुद्धा घरपट्टी माफ करण्याचा निर्णय तातडीने घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे, अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा यांनी केलेली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री हे मुंबईचे असल्याने त्यांनी तातडीने निर्णय घेऊन मुंबईची घरपट्टी माफ केली. घटनेनुसार मुख्यमंत्री पदापेक्षा मोठे पद असलेले, फलटण तालुक्याचे व सातारा जिल्ह्याचे नेते विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या पदाचा वापर करून फलटण शहरातील नागरिकांची घरपट्टी व इतर कर माफ करण्यासाठी निर्देश द्यावेत. व फलटण शहरातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी करावे, अशी मागणी सुद्धा यावेळी शहा यांनी केली.