घरात एकोपा, शांती, समाधान ठेवल्यास भगवंताची सेवा घडते – प्रा. कोकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२४ | फलटण |
मीपणाचा त्याग करून आम्हीचा स्वीकार करणारेच वारीचे वारकरी असतात. सर्वांनी एकमेकांविषयी आदर, आपुलकी, मानसन्मान करून जीवनाचा अविस्मरणीय अनुभव अनुभवणे म्हणजे पंढरीची वारी होय. उत्तम प्रपंच करून दैनंदिन कर्तव्य पार पाडून परमार्थ करणे हे विठ्ठलाला आवडते. जन्म मरणाची वारी आपल्या कर्माने घडते. घरात एकोपा, शांती, समाधान ठेवल्यास भगवंताची सेवा घडते, असे प्रतिपादन कथाकार, प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले.

श्री खंडेश्वरी भजनी मंडळ खांडज (बारामती) यांनी ‘वारीचे वारकरी’ या प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन केले होते. या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रवींद्र कोकरे बोलत होते.

गोपाळकाला, दिंडी सोहळा, भजन, फुगडी, महाप्रसादाचे यानिमित्ताने ग्रामस्थांनी भव्य आयोजन केले होते.

रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरीचा उच्चार, हाच खरा मंत्र होय. कर्म चांगले करून माणुसकी जपणे, सामाजिक जाणिवांचे भान ठेवून दुसर्‍यास मदत करणे हाच खरा वारकरी संप्रदाय आहे, असे विचार कोकरे यांनी साध्या, सोप्या रसाळ भाषेत मांडून भाविकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ताराचंद आगवणे यांनी केले. आभार प्रदर्शन विष्णू सोरटे यांनी केले. तानाजी जाधव, पोपट आटोळे, विजय गुजले, संतोष मोहिते, आप्पा आटोळे, द्रौपदा जाधव, भामाबाई आटोळे, वैशाली कदम, अंजना आटोळे या भाविक भक्तांसह ग्रामस्थांनी उत्तम नियोजन केले. बालगोपाळ व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.


Back to top button
Don`t copy text!