
स्थैर्य, दि.४: एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यातून हॅकरने किंवा अन्य कारणास्तव रक्कम काढून फसवणूक केली आणि त्यात ग्राहकाचा हलगर्जीपणा नसेल तर अशा परिस्थितीत त्याला बँक व्यवस्थापन जबाबदार असेल. यासंदर्भात राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयाेगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आयाेगाचे न्यायाधीश सी. विश्वनाथ यांनी क्रेडिट कार्डामुळे एका अनिवासी भारतीय महिलेच्या झालेल्या फसवणूक प्रकरणात बँक व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.
एचडीएफसी बँकेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावत आयाेगाने पीडित महिलेला ६,११० डाॅलरची (अंदाजे ४.४६ लाख रुपये) रक्कम १२ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.मानसिक छळ केल्याबद्दल पीडितेला नुकसान भरपाई म्हणून आणखी ४० हजार रुपये आणि केस खर्चासाठी ५,००० रुपये देण्याचे आदेश आयोगाने बँक व्यवस्थापनाला दिले आहेत. न्या. सी. विश्वनाथ निर्णय देताना म्हणाले की, पीडितेचे क्रेडिट कार्ड इतर कुणी चोरले आहे याचा पुरावा बँक सादर करू शकली नाही. या महिलेने हॅकरने आपल्या खात्यातून पैसे काढले आहेत आणि बँकेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग यंत्रणेत त्रुटी आहेत असा दावा केला आहे.
काय आहे प्रकरण : आपली लाॅस एंजलिसमध्ये राहणारी मुलगी जेसिना जाेससाठी ठाण्यातील एचडीएफसी बँकेकडून एक प्री-पेड फाॅरेक्स प्लस डेबिट कार्ड २००७ मध्ये घेतले हाेते. १९ डिसेंबर २००८ रोजी बँकेने जेसिकाच्या वडिलांकडून ३१० डॉलर्सची रक्कम काढल्याबद्दल हमी मागितली. वडिलांनी बँकेला असे कोणतेही व्यवहार केले नसल्याचे सांगितले. दुसऱ्याच दिवशी बँकेने १४ ते २० डिसेंबरदरम्यान ६ हजार डॉलर्सची रक्कम काढली असल्याचे सांगितले.
जमा रकमेची सुरक्षितता बँकेची जबाबदारी
या निर्णयामध्ये सर्वाेच्च न्यायालयाने पूर्वीच्या निर्णयाचा हवाला देताना नमूद केले की एखाद्या व्यक्तीच्या खात्यातून (खातेदार वगळता) बेकायदेशीररीत्या पैसे काढले तर त्यासाठी बँकेला जबाबदार धरता येऊ शकते का हा मूळ प्रश्न आहे. याचे उत्तर हाे आहे. जर बँक एखाद्याचे खाते उघडत असेल तर त्या व्यक्तीच्या पैशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी बँकेची आहे. काेणत्याही प्रणालीत बिघाड झाला, मग ताे त्यांच्याकडून असेल वा अन्य प्रकारे (खातेधारक साेडून) तर त्यासाठी ग्राहक नाही, तर बँक व्यवस्थापन जबाबदार असेल. म्हणूनच सध्याच्या प्रकरणातही महिलेच्या खात्यातून अवैधपणे पैसे काढून घेणे आणि फसवणुकीच्या बाबतीत बँकेला ग्राहकांचे नुकसान भरून द्यावे लागेल.