दैनिक स्थैर्य | दि. ३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
तरुणांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना योग्य दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास निश्चित यश मिळते, असे उद्गार श्री. विकास मुळीक यांनी काढले.
नुकतीच स्पर्धा परीक्षेमधून तालुका कृषी अधिकारी म्हणून विकास मुळीक यांची निवड झालेबद्दल ग्रामपंचायत सासकल, विकास सोसायटी सासकल, जि. प. शाळा सासकल, शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल, ग्रामस्थ सासकल यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते.
सासकल(ता. फलटण)चे सुपुत्र श्री. विकास चंद्रकांत मुळीक यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळविल्याबद्दल आयोजकांच्या वतीने सासकलच्या प्रथम नागरिक सौ. उषाताई फुले यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सासकल गावचे ज्येष्ठ नेते नामदेवराव (आप्पा) मुळीक होते. यावेळी श्री. विकास मुळीक यांच्या आई श्रीमती सविता मुळीक, त्यांचे मामा श्री. महावीर कदम, मातोश्री विकास सेवा सोसायटी मर्या. भाडळी बु. चे चेअरमन श्री. मोहनराव डांगे, सासकलच्या माजी सरपंच सौ. नंदिनी(काकी) मुळीक, ग्रामपंचायत सदस्य श्री. मोहनराव मुळीक, सासकल सोसायटीचे व्हा. चेअरमन श्री. सूरज मदने, कृषी सहाय्यक श्री. सचिन जाधव, श्री. संजय चांगण, श्री. विकास मुळीक, श्री. नामदेव मुळीक, श्री. राजेंद्र सावंत, श्री. भैरवनाथ मुळीक, श्री. विष्णु मुळीक, श्री. भगवान मुळीक यांच्यासह जि.प. शाळेचे शिक्षक श्री. पांडुरंग निकाळजे, श्री. सुधीर ढालपे, सौ.रुपाली शिंदे, सौ. किर्ती निकाळजे तसेच माध्यमिक विद्यालयाचे श्री.चंद्रकांत सुतार, श्री. धनाजी मुळीक, सौ. सस्ते मॅडम उपस्थित होत्या.
याप्रसंगी श्री. विकास मुळीक यांनी जि. प. प्राथमिक शाळेपासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंतचे खडतर अनुभव सांगितले; परंतु तरुणांनी अडचणींवर मात करुन अपेक्षित यश प्राप्त करावे, असे आवाहन केले. स्पर्धा परीक्षा देणार्या तरुणांना आवश्यक ते आपले सहकार्य आणि मार्गदर्शन राहील याची ग्वाही दिली.
जेष्ठ नेते श्री. नामदेवराव मुळीक यांनी श्री. विकास मुळीक यांचे अभिनंदन करुन यापुढेही असेच मोठे सत्कार करण्याचे योग यावेत, अशी आशा व्यक्त केली. यावेळी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असलेल्या आई श्रीमती सविता मुळीक आणि मामा श्री. महावीर कदम यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गावातील ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. रुपाली शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर श्री. पांडुरंग निकाळजे यांनी आभार मानले.