दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । सातारा । ३१ डिसेंबर रोजी वनविभागाच्या क्षेत्रात कोणी पार्टी करताना आढळून आल्यास घटनास्थळावरील साहित्य हस्तगत करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे दिला. या दिवशी विशेषता यवतेश्वर, कास, उरमोडी धरण परिसर, ठोसेघर परिसरात दिवस-रात्र गस्त घालण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, प्रत्येक वर्षी येणाऱ्या अडचणी आणि आनंद याची गोळीबेरीज करून आपण नवीन वर्षाला सामोरे जात असतो. प्रत्येक जण नवीन वर्षात काय करायचे विकास संकल्पना, नियोजन आणि आणि काही ठोस भूमिका घेत असतात. प्रत्येक जण आपले ध्येय निश्चित करण्यासाठी या दिवशी प्रयत्नशील असतो. ही अत्यंत चांगली बाब आहे. ३१ डिसेंबर हा दिवस भविष्यातील सकारात्मक दिशेने वाटचाल करण्याचा निश्चय, संकल्प करण्याचा दिवस असतो. याबद्दल सातारा तालुका वन विभागाला अत्यंत अभिमानास्पद वाटते. मात्र याच दिवशी काही अपप्रवृत्ती विचारांचे लोक सातारा शहरा बाहेर ओल्या- सुक्या पार्ट्या करून विपरीत घटनांना निमंत्रण मिळेल अशा प्रकारचे कृत्य करत असतात. सातारा तालुक्यातील काही भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोडला जातो. त्यामध्ये वनविभागाचे क्षेत्र अधिक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने यवतेश्वर, महादरे गाव परिसर, कास, उरमोडी धरण परिसर, ठोसेघर, मालदेव, चाळकेवाडी या प्रसिद्ध ठिकाणांचा समावेश आहे. ३१ डिसेंबर रोजी या ठिकाणी तरुण मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन करण्यासाठी येत असतात. चुलीवर स्वयंपाक करणे, फटाक्यांची आतिषबाजी करणे, पेटत्या सिगारेटची धोटके उघड्यावर टाकणे यामुळे वनक्षेत्रात आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वन्य प्राण्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन ते सैरभैर होत आक्रमक होऊ शकतात. परिणामी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी वन विभागाचा विरोध नाही. मात्र त्याचे निमित्त साधून वन क्षेत्रांमध्ये चुली पेटवणे, फटाक्यांची आतिषबाजी याला विरोध आहे. वन क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना निर्बंध आहेत. त्यामुळे या दिवशी क्षेत्रांमध्ये पार्ट्या करू नयेत अन्यथा घटनास्थळावरील साहित्य हस्तगत करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिला आहे. तसेच या दिवशी दिवस आणि रात्र वन विभागाचे कर्मचारी साध्या वेशात पेट्रोलिंग करणार असून अशा प्रकारचे कृत्य करताना कोणी आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.