
स्थैर्य, सातारा, दि. 25 डिसेंबर : मानवी वस्तींमध्ये बिबट्यांचा वावर वाढत आहे. हा वावर कमी करण्यासाठी वन विभागाने व वन्यजीव विभागाने उपाययोजना कराव्यात. मानवी वस्तीत बिबट्या आढळल्यास घाबरुन न जाता नागरिकांनी तात्काळ वन व वन्यजीव विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
पालकमंत्री कार्यालयात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर यावर करावयाच्या उपायोजनांसदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते (दूरदृष्य प्रणालीद्वारे) कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे आदी उपस्थित होते.
वन विभागाने बिबट्यांपासून संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ज्या गावांमध्ये बिबटे आढळले आहेत त्या गावांमध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व वन विभाग कर्मचारी यांनी मार्गदर्शक उपाययोजनांची जनजागृती करावी व प्रशासन करीत असलेल्या सूचनांची माहिती द्यावी. चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये बिबटे पकडण्यासाठी जास्तीचे पिंजरे लावावेत व त्या ठिकाणी प्राधान्याने ड्रोन कॅमेराचा वापर करावा.
बिबट्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी वन विभागाचा चर खांदण्याचा जुना कार्यक्रम होता. त्या पद्धतीने बिबट्यांचा वावर असणार्या गावांच्या कडेला चर खांदण्यात यावी. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अलार्म सिस्टीम बसविण्यासाठी, ड्रोन व पिंजरे घेण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशीही ग्वाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिली.
बैठकीच्या प्रारंभी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री श्री. देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

