दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । मुंबई । फॉक्सकॉन-वेदांता सेमीकंडक्टर हा दीड लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. यावरून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सातत्याने सरकारवर टीका करत आहे. आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पुण्यातील तळेगाव येथे जनआक्रोश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आदित्य यांनी सत्ताधारी एकनाथ शिंदे सरकारवर कडाडून टीका केली.
वेदांता-फॉक्सकॉनला आपल्या सरकारने १० हजार कोटींची सबसिडी देण्याचं नियोजन केलं होतं. १२०० एकर जागा देणार होतो. मात्र तरी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प जिथे पाणी नाही, वीज नाही तिथे गेलाच कसा असा प्रश्न उपस्थित होतो, असंही आदित्य यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर खोके सरकार म्हणून पुन्हा टीका केला.
गुजरातच्या उद्योगमंत्र्यांनी चांगलं काम केलं. मी गुजरात किंवा केंद्र सरकारला दोष देणार नाही. पण दोष खोके सरकारचा आहे. तळेगावमध्ये काहीही कमतरता नाही. सर्वकाही असून प्रकल्प तिकडे गेला. मुख्यमंत्री शिंदेंना काहीच माहित नव्हतं. त्यांना वेदांता-फॉक्सकॉन काय हेच कळत नव्हतं. त्यांनी मला विचारलं असतं, तर मी त्यांनी सांगितलं असतं की, ५० खोके तिकडेही पाठवा अन् प्रकल्प आपल्याकडे आणा, असा टोलाही आदित्य यांनी लगावला.