
स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑगस्ट : विद्यार्थी कोणत्या सामाजिक स्तरातून आला आहे हे महत्त्वाचे नसून, त्याची बुद्धिमत्ता ओळखून त्याला दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन कमिन्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि ऑपरेशन्स अध्यक्ष बॉनी फेच यांनी केले. फलटण नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ८ च्या, कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या नूतनीकरण आणि डिजिटल क्लासरूमच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
कमिन्स इंडियाच्या सीएसआर फंडातून शाळेचे कंपाऊंड, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, स्वच्छतागृह आणि डिजिटल क्लासरूम अशा विविध भौतिक सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधांचे उद्घाटन बॉनी फेच यांच्या हस्ते करण्यात आले. लेझीम आणि ढोल-ताशाच्या निनादात केलेल्या स्वागताने त्या भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. हसऱ्या मुलांना पाहून आपल्याला आपल्या नातवंडांची आठवण झाल्याचेही त्या म्हणाल्या.
कमिन्सच्या सहकार्यामुळे शहराच्या सुशोभीकरणात भर पडली असून, ‘माझी वसुंधरा’ सारख्या उपक्रमात पालिकेला यश मिळाले, असे नगर परिषद प्रशासक निखिल मोरे म्हणाले. पाच वर्षांपूर्वी शाळेची स्थिती बिकट होती, मात्र आता नूतनीकरणामुळे विद्यार्थी संख्या दुपटीने वाढली आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे कमिन्स फाउंडेशनचे प्रविण गायकवाड यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला कमिन्सचे मुख्य पुरवठा साखळी अधिकारी शुभंकर चॅटर्जी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, मुख्याधिकारी निखिल मोरे, मुख्याध्यापक दिपक पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोडसे यांनी केले.