दैनिक स्थैर्य | दि. 14 जानेवारी 2025 | फलटण | आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य आणि दिमाखदार सोहळा शुक्रवार दि. 10 जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता सजाई गार्डन, फलटण येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी संस्थेच्या संस्थापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मृणाल गायकवाड, संस्थेचे संचालक शिवराज भोईटे, पल्लवी गाडगीळ, मयूर भोईटे, हर्षल लोंढे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. “होम मिनिस्टर” फेम नितीन गवळी यांनी अतिशय प्रभावीपणे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमात डॉ. सौ. वैशाली शिंदे, मृणाल गायकवाड आणि शिवराज भोईटे यांच्या हस्ते “स्टुडंट ऑफ द इयर” पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्युनिअर केजी ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गातील स्टुडन्ट ऑफ द इयर ठरलेल्या विद्यार्थ्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठलाच्या भक्तिगीतेने झाली. “ज्ञानबा-तुकाराम”च्या गजराने सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. इयत्ता नववीतील विद्यार्थी यश पोळ याने वेलकम स्पीच केली. ज्युनिअर केजी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करत प्रेक्षकांचे मन जिंकले. हायर ग्रेडच्या विद्यार्थ्यांनी “रामायण” या थीमवर आधारित म्युझिकल ड्रामा सादर केले, ज्यामध्ये रामायणातील विविध प्रसंग विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर नृत्यातून प्रभावीपणे सादर केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या मृणाल गायकवाड यांना “तेजस्विनी अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शाळेतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना दिला जातो. मृणाल गायकवाड या मृणाल इंटरटेनमेंटच्या संस्थापक असून, मिसेस महाराष्ट्र, मिसेस इंडिया आणि मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल टायटल्सच्या मानकरी आहेत. कोरिओग्राफर तेजस फाळके, स्मिता पवार, श्रावणी पवार, साऊंड व्यवस्थापक जयवंत मुळीक, इव्हेंट मॅनेजर महेश जगताप, तसेच आयडियल कमिटी सदस्य मेघा लोंढे यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात डॉ. सौ. वैशाली शिंदे यांनी पालकांशी संवाद साधत शाळेच्या प्रगतीची माहिती दिली. आयडियल इंटरनॅशनल स्कूल नावाप्रमाणे संस्कार, संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे डायरेक्टर शिवराज भोईटे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. “आधुनिक तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने शाळा यशाची नवीन शिखरे गाठेल,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचा समारोप सेंटर हेड सुचिता जाधव यांनी आभार प्रदर्शनाने केला. शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापन टीमने संस्थेच्या संस्थापक डॉ. सौ. वैशाली शिंदे आणि डायरेक्टर शिवराज भोईटे यांच्यासह आकर्षक रॅम्प वॉक केला. या सोहळ्याचे यश संस्थापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या उत्कृष्ट नियोजन, सादरीकरण आणि व्यवस्थापनामुळे शक्य झाले. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून योग्य असा प्लॅटफॉर्म देण्यासाठी त्या कायम धडपडत असतात.