
स्थैर्य, सातारा, दि. 27 नोव्हेंबर : पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात येत असून, उमेदवारांनी घरोघरी फिरत मतदारांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा असणार्या मतदानाची तयारी करण्यासाठी निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. शहरासह परिसरातील 156 मतदान केंद्रे त्यासाठी सज्ज करण्यात येत आहे. सर्वच मतदान केंद्रात पायाभूत सुविधांसह सुरक्षाविषयक उपाययोजना उभारण्यात येत असून, हे काम पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.
पालिकेच्या निवडणुकीसाठी 25 द्विसदस्यीय प्रभागातील नगरसेवकांसह नगराध्यक्षपदासाठीची थेट निवडणूक होत आहे. 47 नगरसेवकपदांसाठी 169, तर नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर दोन्ही राजांचे नेतृत्व मानणार्या बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या बंडखोरांच्या वाटणीला जाणार्यामतांमुळे अधिकृत उमेदवार धास्तावले असून, त्यांनी सर्वच पातळीवर मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना मतदार मतांच्या रूपात किती प्रतिसाद देतात, याचा फैसला मंगळवारी(ता. 2) होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठीची सर्व यंत्रणा पालिकेच्या देखरेखीखाली निवडणूक विभाग उभारत आहे. पाणी, विद्युत यंत्रणा, स्वच्छतागृहे यासह इतर पायाभूत सुविधांचा यात समावेश असून, हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.
आदर्शवत मतदान केंद्र उभारण्यासाठीची प्रक्रिया पालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. यासाठीच्या तांत्रिक प्रक्रियेला पहिल्या टप्प्यात प्रतिसाद न मिळाल्याने ती पुन्हा नव्याने राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गोडोली परिसरातील एक मतदान केंद्र आदर्शवत असे तयार करण्यात येणार आहे.
हद्दवाढीनंतर पालिकेत शाहूपुरी, विलासपूर या दोन ग्रामपंचायतींसह शाहूनगर व इतर उपनगरांचा समावेश आला. या भागांना सामावून घेत प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. प्रभागानुसार 156 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, या मतदान केंद्रांच्या सुरक्षिततेचा आढावा पोलिस दलाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांनुसार मतदान केंद्रे आणि त्याठिकाणी उभारण्यात येणार्या सुविधांचा आढावा वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येत असून, त्यासाठी जास्तीचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

