
स्थैर्य, फलटण, दि. १७ नोव्हेंबर : गोल्डन ड्रीमस् एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. वैशाली शिंदे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, फलटण येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या दोन्ही शाखांचा वार्षिक क्रीडा महोत्सव (स्पोर्ट्स डे) नुकताच उत्साहात संपन्न झाला. विमानतळ मैदानावर १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या या दोन दिवसीय महोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये जोश, शिस्त आणि क्रीडाभावाचा नवा उत्सव उभा केला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यानंतर खेळाची प्रतिज्ञा घेण्यात आली. सिनियर केजी ते दहावीपर्यंतच्या ‘क्लास अॅम्बेसिडर्स’नी (वर्ग प्रतिनिधी) काढलेली पारंपरिक मशालफेरी आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध परेडने वातावरणात चैतन्य निर्माण केले. शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले.
या महोत्सवात प्ले-ग्रूपपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार विविध स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी रनिंग रेस, कोन रेस, डंबेल रेस, रिंग रेस, बुक बॅलन्सिंग, सॅक रेस (पोत्यांची शर्यत), टग ऑफ वॉर (दोरीखेच) आणि शॉटपुट (गोळाफेक) अशा वैयक्तिक कौशल्याच्या स्पर्धा पार पडल्या.
दुसऱ्या दिवशी हाऊसवाइज (गटानुसार) खेळल्या गेलेल्या सेवन स्टोन, फुटबॉल, क्रिकेट आणि रिले यांसारख्या सांघिक स्पर्धांनी वातावरण अधिक रंगतदार बनले. मैदानावर सादर झालेल्या प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साह, आत्मविश्वास आणि निरोगी स्पर्धात्मकता प्रकर्षाने जाणवत होती.
प्रत्येक स्पर्धेनंतर विजेत्यांचा सन्मान मैदानावरील विशेष मंचावर संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वैशाली शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनुसार प्रमाणपत्र, मेडल्स आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या, ज्यामुळे संपूर्ण मैदान जल्लोषात न्हाऊन निघाले. यावेळी शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे, सेंटर हेड सुचिता जाधव आणि मोठ्या संख्येने उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीला भरभरून दाद दिली.
या क्रीडा महोत्सवाच्या यशाचे मूळ आधारस्तंभ म्हणजे डॉ. वैशाली शिंदे यांचे उत्कृष्ट आणि सूक्ष्म नियोजन. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेचे सेक्रेटरी निखिल कुदळे, तसेच क्रीडा समन्वयक प्रवीण पवार आणि तेजस यांनी मैदानावर सक्रिय राहून स्पर्धा सुरळीत पार पाडण्यात मोलाचे योगदान दिले. मॅडमच्या दूरदर्शी नियोजनाला संपूर्ण ‘आयडियल टीम’ने (शिक्षकवृंद) एकसंधपणे उत्कृष्ट साथ दिली.
अशा स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सांघिक भावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सहकार्य आणि लक्ष केंद्रित करण्याची वृत्ती विकसित करतात. ताणतणाव व्यवस्थापन आणि निर्णयक्षमता वाढवण्यासाठी खेळ हे महत्त्वाचे साधन आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा अशा उपक्रमांना नेहमीच महत्त्व देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

