‘आयडियल’मध्ये देशभक्तीचा जागर; ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात! चिमुकल्यांचे संचलन अन् ‘सायन्स रोबो फेस्ट’ने वेधले लक्ष


आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा. नाईक सुभेदार उदय पोळ यांची प्रमुख उपस्थिती. विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, लेझीम कवायत आणि ‘सायन्स रोबो फेस्ट’ ठरले आकर्षण. वाचा सविस्तर वृत्त…

स्थैर्य, फलटण, दि. ३० जानेवारी : येथील गोल्डन ड्रीम्स एज्युकेशन सोसायटी संचलित आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जाधववाडी (Ideal International School, Jadhavwadi) येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. भारतीय सैन्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांमुळे या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती.

सैनिकांच्या हस्ते ध्वजपूजन

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या भव्य स्वागताने झाली. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यात कार्यरत असलेले नाईक सुभेदार उदय पोळ, सारिका पोळ, शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे सर, मयूर सर, मंदार पाटसकर सर आणि सावकार व्यापार संघटनेचे अध्यक्ष वसीम मनेर सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करून सन्मानाने ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, झेंडा गीत, राज्य गीत आणि संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. इयत्ता सातवीचा विद्यार्थी विश्वजीत लाड याने आपल्या स्वागतपर भाषणातून सर्वांची मने जिंकली.

संचलन आणि चिमुकल्यांचा ‘जल्लोष’

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध ‘मार्च पास’ने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी साक्षरतेची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण! नर्सरी ते सिनियर केजीच्या चिमुरड्यांनी देशभक्तीपर गीतांवर सादर केलेले नृत्य आणि थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेतील त्यांची अदाकारी पालकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली.

लयबद्ध कवायत आणि गुणवंतांचा गौरव

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ढोलच्या तालावर काठी, लेझीम आणि डंबेल्सचा वापर करून अतिशय शिस्तबद्ध व आकर्षक कवायत प्रकार (Drill) सादर केले. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनीही देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात चमकणाऱ्या आणि ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

‘सायन्स रोबो फेस्ट’ आणि कलेचा संगम

शाळेत आयोजित केलेल्या ‘सायन्स रोबो फेस्ट’ चे (Science Robo Fest) उद्घाटन शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे सर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प, त्यांचे सादरीकरण आणि रोबोटिक्स मॉडेल्स पाहून मान्यवर थक्क झाले. तसेच, नाईक सुभेदार उदय पोळ व वसीम मनेर यांच्या हस्ते आर्ट अँड क्राफ्ट, रांगोळी आणि ‘वेस्ट आउट ऑफ बेस्ट’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या कलाकृतीतून विद्यार्थ्यांची कल्पकता दिसून आली.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. सौ. वैशाली शिंदे (Dr. Vaishali Shinde) यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी झाला. कार्यक्रमाचे नियोजन व प्रभावी सूत्रसंचालन पूजा बाबर मॅडम यांनी केले, तर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी निलया ननावरे हिने आभार मानले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी निखिल कुदळे, सेंटर हेड सुचिता जाधव यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!