
फलटणच्या आयडियल इंटरनॅशनल स्कूलचा ‘इन्क्रेडिबल इंडिया’ स्नेहसंमेलन सोहळा दिमाखात पार पडला. ‘वीर शिवा काशीद’ नाटकाचा थरार, इयत्ता आठवीची ‘इन्स्पिरेशन थीम’ आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
स्थैर्य, फलटण, दि. 03 जानेवारी : सजाई गार्डनचा परिसर शनिवारी सायंकाळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. निमित्त होते, आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या “Incredible India 2025-26” या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे. नृत्याचा ताल, अभिनयाची जोड आणि इतिहासाचा जिवंत देखावा अशा त्रिवेणी संगमात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विशेषतः ‘वीर शिवा काशीद’ यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक नाट्याने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि प्रमुख पाहुणे म्हणून आयकर आयुक्त (पुणे) डॉ. नितीन वाघमोडे उपस्थित होते. याशिवाय उद्योजक सतीश जगदाळे, होम मिनिस्टर फेम नितीन गवळी, अजय जाधव, समीर तांबोळी, सागर बरकडे, लखन बरकडे, योगगुरु विद्या शिंदे, श्रद्धा शहा आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे, डायरेक्टर शिवराज भोईटे, सेक्रेटरी निखिल कुदळे आणि सेंटर हेड सुचिता जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
इतिहासाचा थरार आणि अश्रूंचा बांध
सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे ऐतिहासिक ‘वीर शिवा काशीद’ नाट्यप्रयोग. पन्हाळगडाचा वेढा आणि शिवा काशीद यांचे बलिदान हा प्रसंग विद्यार्थ्यांनी इतका जिवंत साकारला की सभागृह भावविभोर झाले. या नाटकानंतर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्याचे घोड्यावरून झालेले आगमन अंगावर शहारे आणणारे ठरले. सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘आया रे आया तुफान’ गाण्यावर नृत्य सादर करत शिवरायांना मानवंदना दिली.
कलेचा आणि प्रेरणेचा आविष्कार
कार्यक्रमाची सुरुवात ‘शिवतांडव’ नृत्याने झाली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘इन्स्पिरेशन थीम’ सादर करत जिद्द आणि चिकाटीचा संदेश दिला, जो प्रेक्षकांच्या मनाला भिडला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्कूल लाईफ’ थीमद्वारे शाळेतील आठवणींना उजाळा दिला, ज्यामुळे अनेक पालकांच्या आणि शिक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. नर्सरी आणि केजीच्या चिमुकल्यांनी ‘बूम बूम इंग्लिश’ आणि ‘जिंगल बेल’ वर ताल धरत सर्वांची मने जिंकली. ओडिसी-संबळपुरी नृत्य, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि रेट्रो गाण्यांवरील नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
गुणवंतांचा गौरव आणि मान्यवरांचा सन्मान
शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ‘Student of the Year’ किताबाने गौरव करण्यात आला. यामध्ये अरिहा गुंदेचा (पीजी), यश पोळ (दहावी), फैज मनेर (नववी) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचा समावेश होता. क्रीडा विभागात ‘यलो हाऊस’ने बाजी मारली.
यावेळी शाळेच्या वतीने प्रमुख पाहुणे डॉ. नितीन वाघमोडे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील ‘टॅंक मायग्रेशन’ सारख्या उपक्रमांतून त्यांनी केलेले जलसंधारण आणि ग्रामीण विकासाचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, तर नृत्याचे दिग्दर्शन प्रशांत भोसले आणि तेजस फाळके यांनी केले. सूत्रसंचालन नितीन गवळी यांनी आपल्या बहारदार शैलीत केले.

