
स्थैर्य, फलटण, दि. ०१ ऑक्टोबर : नवरात्रोत्सवानिमित्त स्त्रीशक्तीचा गौरव, भक्तिभाव आणि परंपरेचे जतन यांचा संगम साधत, आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी माळजाई मंदिरात एका अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘ऐगिरी नंदिनी’ या महिषासुरमर्दिनी स्तोत्राने अवघे मंदिर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
यावेळी शाळेच्या चौथी ते नववी इयत्तेतील विद्यार्थिनींनी सामूहिकपणे ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्रा’चे भक्तिभावाने सादरीकरण केले. हा ‘जगदंबेचा विजयघोष’ सुरू असताना, देवीच्या नऊ रूपांमध्ये (शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी व सिद्धिदात्री) विद्यार्थिनी चौरंगावर विराजमान झाल्या होत्या, ज्यामुळे उपस्थितांना नवदुर्गांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
या पावन क्षणी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे यांनी ‘नवदुर्गा’ रूपी सर्व विद्यार्थिनींची पाद्यपूजा करून त्यांचे औक्षण केले आणि त्यांना भेटवस्तू व प्रसाद देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाचा दुसरा भाग महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘भोंडला’ या सामूहिक खेळाने रंगला. गजराजाच्या मूर्तीभोवती विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांनी “ऐलमा पैलमा गणेश देवा…” अशी पारंपरिक गाणी म्हणत फेर धरला. स्त्री-एकतेचे प्रतीक असलेल्या या खेळाने वातावरणात आगळाच उत्साह निर्माण केला.
या कार्यक्रमासाठी माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, लायन आय हॉस्पिटलचे चेअरमन अर्जुनराव घाडगे, चंद्रकांत कदम, दिलीप शिंदे, महेश गरवालिया, स्वीकार मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींच्या अप्रतिम सादरीकरणाचे कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे श्रेय मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला जाते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.