दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । सातारा । राष्ट्रवादी काॅंग्रेस वाढावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत असताे. सातारा जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या मजबूतीसाठी माझे प्रयत्न सुरु असतात. त्यातून काेणाच्या भावना दुखवल्या जात असतील तर माझा नाईलाज आहे. यापुर्वी जावळीत मी लक्ष घातले नव्हते परंतु आता जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याकरिता आता मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले. दरम्यान भाजप आमदार शिवेंद्रसिंहाराजे भाेसले यांनी माझ्यासाठी प्रयत्न केल्याचे शिंदेंनी नमूद केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज (रविवार) विविध तालुक्यांत मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. जावळीत आमदार शिंदे गट व प्रतिस्पर्धी रांजणे गट यांच्यात तणाव झाला. दाेन्ही गटातील नेते, पाेलिसांच्या आवाहानानंतर तणाव निवळला.
यावेळी पत्रकारांशी शी बाेलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले प्रतिस्पर्धी उमेदवार ज्ञानदेव रांजणे हे तांत्रिकदृष्टया राष्ट्रवादीत आहेत. अन्य सर्व लाेकांना ते माहित आहे. मतदान प्रक्रियेच्या काळात फार माेठा राडा झाला नाही. केवळ बाचाबाची झाली. नंतर ती आम्ही मिटवली.
आ. शिंदे म्हणाले कि, मी अजून पर्यंत जावळीत लक्ष घातले नव्हते. आता या पुढे लक्ष घालीन. जावळीतील जनता १०० टक्के माझ्या पाठीशी आहे. काही स्वार्थी आहेत. ते गेले. आम्ही पुन्हा येथे राष्ट्रवादीची ताकद उभी करु. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्हाभरातील सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले आहेत. मी पक्षाचा एकनिष्ठ आहे. माझ्या पक्षासाठी मी लढत राहताे. सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांची नाळ माझ्याशी जाेडली गेली आहे.
भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी तुमच्यासाठी प्रयत्न केला. त्यांना मानणा-या कार्यकर्त्यांनी त्यांचे का ऐकले नाही असा प्रश्न केला असता आ. शिवेंद्रराजे यांनी प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे. प्रयत्न केल्यानेही लाेक मानत नसतील तर उद्याचा संघर्ष हा त्या लाेकांबराेबर असेल असे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.