
स्थैर्य, फलटण, दि. 15 नोव्हेंबर : “गेल्या ३० वर्षांत आम्ही तालुक्यात कधीही गावोगावी भांडणे लावली नाहीत, उलट गटबाजी कमी करून विकास साधण्यावर भर दिला. मात्र, सध्या तालुक्यात प्रशासकीय दहशत आणि पोलिसांचा वापर करून कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. हे दहशतीचे राज्य, गटबाजीचे राजकारण आणि पोलिसांचे राज्य मी संपवूनच दाखवेन,” असा घनघाती इशारा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
बिबी (ता. फलटण) येथे विविध विकासकामांच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक चव्हाण होते. यावेळी आयोजित जाहीर सभेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधक आणि प्रशासन यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. सध्या तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय दबावाच्या प्रकारांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले.
पाणी प्रश्नावरून विरोधकांनी श्रेय घेण्याच्या प्रकारावर रामराजे नाईक निंबाळकर यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “निरा-देवघर आणि धोम-बलकवडीचे पाणी आम्ही आणले, असे काही लोक सांगत आहेत. परंतु, जर मुळात निरा-देवघर धरणच झाले नसते, तर तुमच्या पाईपलाईनला पाणी आले असते का? १९९६ मध्ये मी आमदार झालो, तेव्हा कृष्णा लवादानुसार २००० सालापर्यंत पाणी अडवणे बंधनकारक होते. अन्यथा ते पाणी कर्नाटक आणि आंध्रला गेले असते. ती रात्र मला आठवते, जेव्हा मी या चिंतेने झोपू शकलो नव्हतो. आम्ही कष्ट उपसले, आज मात्र विरोधक आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम करत आहेत.”
अलीकडच्या काळात आपल्यावर होणाऱ्या ‘मास्टरमाईंड’च्या आरोपाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. “मला मास्टरमाईंड म्हणणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. भर उन्हाळ्यात धोम-बलकवडीचे पाणी स्वतःच्या कारखान्यासाठी चोरून नेणारा आणि १५-२० गावांच्या विहिरी कोरड्या पाडणारा खरा मास्टरमाईंड कोण होता, हे जनतेला माहित आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, मी आजही जनतेत एकटाच फिरतो,” असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
विकासाची पुढील दिशा स्पष्ट करताना रामराजे म्हणाले की, पुढचे जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) असणार आहे. आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एआयचे हब आणण्याचे माझे स्वप्न आहे. आज माथाडी कामगाराची मुलगी आयटी इंजिनिअर होऊन मुंबईत नोकरी मागायला येते, हेच आमच्या गेल्या ३० वर्षांच्या विकासाचे खरे यश आहे. केवळ रस्ते आणि इमारती नाही, तर माणसांचे जीवनमान उंचावणे हे आमचे ध्येय आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार दीपक चव्हाण यांनी कामांच्या प्रसिद्धीबाबत खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “बिबी गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे ६१ लाखांचे सुशोभीकरण, रस्ते, शाळा अशी कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. आम्ही कामे करण्यात कमी पडलो नाही, पण प्रसिद्धी करण्यात कमी पडलो, त्यामुळे मागच्या निवडणुकीत आम्हाला फटका बसला. विरोधक मात्र आमच्याच काळात मंजूर झालेल्या जुन्या कामांची उद्घाटने करून श्रेय लाटत आहेत, यापासून नागरिकांनी सावध राहावे.”
या कार्यक्रमास बिबी परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळातील राजकीय संघर्ष तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

