स्थैर्य, कोळकी :
माझे जीवाची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधिले ।।
या एकाच उद्देशाने महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून अलंकापुरीत दाखल झालेल्या लाखो वारक-यांच्या मुखी ‘माऊली-माऊली’ हा एकच जप करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने विठ्ठलाच्या नामघोषात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवल्यापासूनच फलटणकरांना माऊलींच्या पालखीचे वेध लागतात. प्रशासनासहित सामाजिक कार्यकर्त्यांची सेवाभावी वृत्तीने तयारी सुरु होते. सोहळ्यासाठी महिनाभर जिल्हाप्रशासन नियोजन करत असते. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका, निरास्नान,चांदोबाचा लिंब आदी ठिकाणी भेटी सुरु असायच्या. वारकर्यांना पाणी, वीज, आरोग्य, सुरक्षा, अन्न याची अडचण येणार नाही, यासाठी प्रशासन दिवसरात्र झटत असे. परंतु यावर्षी मात्र काहीच नाही. ”भेटी लागे जेव्हा लागलीसे आस” या प्रमाणे आळंदी ते पंढरपुर या अंतराच्या बरोबर मध्यावर असणार्या फ़लटणकरांना परंपरेप्रमाणे माऊलींची सेवा करण्याची ओढ होती, परंतु कोरोनाच्यशा पार्श्वभुमीवर माऊलीची पायी वारीच रद्द झाल्याने सेवेकरी सेवेला मुकला याबद्दलची रूखरुख प्रत्येकाच्या मनात आहे. निरास्नान करुन माऊलींच्या पादुका पुढे मार्गस्थ झाल्या की, फलटणकरांना माऊलींच्या आगमनाचे वेध लागायचे. लोणंद मुक्काम झाल्यानंतर चांदोबाचा लिंब येथे माऊलीच्या पालखी सोहळ्यातील नेत्रदिपक सोहळा म्हणजेच पहिले उभे रिंगण संपन्न व्हायचे. श्री संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबध्द उभी रांग माऊलींच्या अश्वांनी घेतलेली दौड दिंडीतील वारकर्यांच्या पायांनी धरलेला ठेका टाळ-मृदंगांच्या गजरात रंगलेल्या फुगड्या अन् हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारीच्या वाटेवरचा पहिल्या उभ्या रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा ‘चांदोबाचा लिंब’ येथे उत्साहात पार पडायचा.
पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सार्या विठ्ठलभक्त वारकर्यांना वेध लागत होते. ते या सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचे. संपूर्ण पालखी सोहळ्यातील वारकर्यांची व भाविकांची पावले लगबगीने चांदोबाच्या लिंब या दिशेने पडत होती. हा सोहळा जसा पुढे पुढे सरकत असायचा, तसा रस्त्यांच्या दुतर्फा असणार्या स्थानिक नागरिकांच्या चेहर्यावरून आनंद ओसांडून वाहत असायचा. रस्त्याकडील बाजूला असणार्या शेतामध्ये ठिकठिकाणी भारूडं, भजने रंगली जायची. माऊलीचे उभे रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावांमधील भाविक भक्त व वारकर्यांनी या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे. दरम्यान माऊलींचा रथ चांदोबाचा लिंब येथे यायचा तेव्हा गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला तरी, पालखी सोहळ्यातील बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र निरव शांतता पसरायची. कोणतीही सुचना न देता वारकर्यांच्या गर्दीतील लाखो वारकरी दुतर्फा व्हायचे व मध्ये अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात यायची. रिंगण लाऊन घेतल्यानंतर रथापुढील 27 दिंड्यांमधून माऊलींचा अश्व पुजारी दौडत आणायचे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मगील दिंड्यापर्यंत नेल्यांनतर पुन्हा परत माघारी पळत यायचा. माऊलींच्या रथाजवळ अश्व आल्यांनतर सोहळा प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालुन खारीक-खोबर्याचा नैवद्य दाखविला जात होता. यानंतर अश्वाने दौड घेतली की, पुढे माऊलींचा अश्व व मागे स्वारीचा अश्व अशी दौड पूर्ण व्हायची. अश्वास प्रत्यक्ष माऊलींचा आशीर्वाद असतो, या भावनेने अश्व ज्या ठिकाणाहून गेला. तेथील त्याच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडायची. अशा तर्हेने पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडायचे. या नंतर पालखी सोहळा तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी तरडगाव येथील पालखी तळावर विसावत होता. हरी नामाच्या गजरात दुमदुमते आसमान व वरुण राजाचा हलका शिडकावा. या आल्हाददायी वातावरणात लाखो नेत्रांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवता येत होता. आणि येथूनच फलटणकरांची खरी लगबग सुरु व्हायची.
शहरासह परिसरात एक वेगळेच चैतन्य निर्माण व्हायचे. दिवसरात्र गोंधळ गडबड सुरु असायची. पहावे तेथे भगवी पताका खांद्यावर घेऊन माऊली माऊली जप करणारे वारकरी. मेवामिठाईची दुकाने,फिरते विक्रेते सर्वत्र जत्रेचे स्वरुप असायचे. वारकर्यांना चहापाण्यापासून जेऊ घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह संचारलेला असायचा. तर अनेक घरांतून वारकर्यांना जेऊ घालण्याची परंपरा होती. फलटण हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेले अनेक वारकरी महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूरचा महादेव, गोंदवले, म्हसवड येथे दर्शनासाठी जात असत व परत बरड मुक्कामी वारीत सहभागी होत असत. फलटण येथील श्रीराम मंदिरासह विविध मंदिरात देखील वारकर्यांच्या दर्शनासाठी रांगा लागायच्या. मात्र यावर्षी या सार्या आठवणीच राहिल्या. सर्वत्र सन्नाटाच जाणवत असून लहानांपासून थोरांपर्यंतत सार्यांच्या मनात रुखरुख आहे.
याबद्दल काही प्रातिनिधीक प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता फलटणचे तत्कालिन नायब तहसिलदार नंदकुमार भोईटे म्हणाले की, प्रशासनातल्या प्रत्येक घटकाला माऊलींची सेवा करण्याची ओढ असायची आणि ते भाग्य मला लाभले याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजत आहे. तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे म्हणाले की, पोलिसांना वारकर्यांच्या सुरक्षेचा ताण असायचा परंतु वारकर्यांची माऊलींविषयी उन्हातान्हासह पावसांतून कशाचीही पर्वा न करता जी ओढ होती ते पाहूनच हा ताण निवळायचा व वेगळेच समाधान वाटायचे शाररिक ताण नाहिसा होत होता. याबाबत बोलताना कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे म्हणाले की, पालखीसोहळा कोळकी हद्दीतून पंढरपूरकडे मार्गक्रमण करायचा या पालखी सोहळ्याचे चैतन्य याची देहा डोळा अनुभवले हे या वर्षी करू शकत नाही, याची खंत कधीच विसरू शकत नाही. याबाबत बोलताना कोळकी ग्रामपंचायतीचे अधिक्षक कैलास नाळे, म्हणाले की, रस्त्याने जाण्यार्या वारकर्याची सेवा करताना जो आनंद होता तो आनंद या वर्षी मिळणार नाही याबाबत दु:ख होत आहे. ती एक आनंद वारी होती आणि त्याची अनुभूती वेगळीच होती. याबाबत राजकीय नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, राजकारणविरहित वारकर्यांची पर्यायाने माऊलींची सेवा करण्याचे भाग्य जनप्रतिनिधी या नात्याने करावयास मिळत होते. परंतु कोरोनामुळे यावर्षी संधी नाही याची सल मनात कायम राहील. पत्रकारांचीही समाजसेवेबरोबरच आपापल्या वर्तमानपत्राला बातमी व विविध क्षण टिपलेले फोटो पाठविण्यासाठी धावपळ सुरु असायची. समाजातील सर्वच घटक तसेच सर्वधर्मीय माऊलीच्या सेवेत आपापल्यापरिने तन,मन,धनाने सहभागी होत असत. सोहळा तरडगावंला आल्यापासून ते बरडला मार्गस्थ होईपर्यंत शहरासह संपूर्ण परिसर गजबजलेला, भक्तीभावाने भारावलेला असायचा परंतु आज मात्र सुन्या सुन्या शहरात माऊलीशिवाय सन्नाटा जाणवत आहे. जैत रे जैत चित्रपटात गीतकार ना.धो.महानोर यांचे गीत आहे, तुझ्या रुपाचं बाशिंग डोल्यांत…तुझ्या वाचून सुन्नाट दिनरात…. अशाच सर्वांच्या भावना माऊलीचा पायी वारी सोहळा रद्द झाल्यामुळे अनुभवयास येत आहेत.
– राजेंद्र पोरे,
संपादक, साप्ताहिक लोकपार्थ एक्सप्रेस